धैर्यशील कदम आणि शंभूराज देसाईंची भेट; तानाजी पाटील अर्ज मागे घेणार का?


धैर्यशील कदम यांनी घेतली 

शंभूराज देसाई यांची भेट

शिवसेनेचे तानाजी पाटील अर्ज मागे घेणार?

सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक

सातारा (संतोष शिराळे) : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी आज सातारा येथील निवासस्थानी राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी धैर्यशील कदम आणि शंभूराज देसाई हे एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीने धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी दिली असली तरी शिवसेना (शिंदे गट) समर्थक अपक्ष उमेदवार तानाजी पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तानाजी पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की लढतीत कायम राहणार, याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या राजकीय तणावाचीही या निवडणुकीला किनार लाभली आहे. त्यामुळे शिवसेना महायुती धर्म पाळणार की स्वतंत्र राजकीय भूमिका घेणार, याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, “आम्ही महायुतीचा धर्म पाळण्याचे काम करू,” असे स्पष्ट संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील मतभेदांवर पडदा पडणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

तानाजी पाटील अर्ज मागे घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याचे उत्तर काही तासांत स्पष्ट होणार असून या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक एकतर्फी होणार की लढतीमुळे चुरस निर्माण होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता तानाजी पाटील यांच्या निर्णयाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments