ऐतिहासिक महादरे- हत्ती तलावाचे लवकरच सुशोभिकरण : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


ऐतिहासिक महादरे- हत्ती

तलावाचे लवकरच सुशोभिकरण

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; २८ एकरवर बगीचा, विरंगुळा केंद्राची उभारणी

सातारा : सातारा नगरपालिकेच्या मालकीच्या ऐतिहासिक महादरे तलाव व हत्ती तलाव परिसराचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सुमारे २८ एकर जागेवर हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून त्यामध्ये बगीचा, विरंगुळा केंद्र आदी कामे करण्यात येणार आहेत. याच परिसरातून रिंगरोड जाणार असल्याने त्याठिकाणी पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. सातारा पालिकेला माझी वसुंधरा अभियानातून मिळालेल्या ६ कोटींच्या बक्षिसातून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तसेच फुलपाखारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या दरे गावात फुलपाखरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सातारा पालिकेच्यावतीने महादरे तलाव, हत्ती तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या नियोजित कामाच्या जागेची पाहणी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सकाळी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर, गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, शहर नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेविका मुक्ता लेवे, मुख्याधिकारी विनोद जळक, नगर अभियंता दिलीप चिद्रे, दिग्वीजय गाढवे, शरद बर्डे, अनिकेत कासार आदी उपस्थित होते.


ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेला माझी वसुंधरा अभियानांतर्गत ६ कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. या निधीतून महादरे व हत्ती तळे परिसरातील २८ एकर जागा सातारा पालिकेच्या मालकीची आहे. या जागेत बगीचा विकसित करावा अशी मागणी नागरिकांची आहे. त्यानुषंगाने आज पदाधिकारी, नगरसेवकांसह जागेची पाहणी केली. तळ्यात पाणीसाठा रहावा व परिसर नीटनेटका रहावा यावर चर्चा झाली. हद्दवाढ झाल्यामुळे हा परिसर सातारा पालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट झाला असून नियोजित रिंगरोडही याच परिसरातून जाणार आहे. दळणवळणाची चांगली सोय होणार असून सुंदर बगीचा निर्माण झाला तर नागरिकांसाठी विरंगुळा होईल. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. तीन टप्प्यात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.


याशिवाय या प्रकल्पाचा पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे. नियोजित रिंगरोड हा कास रोडला जोडूनच खाली येणार असल्याने प्रवासी, पर्यटक या प्रकल्पाला भेट देऊ शकतील. शहरवासियांना विरंगुळा व मुलांना खेळण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होणार आहे. फुलपाखरांचं गाव म्हणून दरे गाव ओळखले जाते. येथील डोंगर परिसरात फुलपाखरांचे संवर्धन करण्यात येणार आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने हा परिसर विकसित करून प्रसिद्धी केली जाईल. फुलपाखरांवर संशोधन करणार्‍या संशोधकांनाही सोबत घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरे परिसरात वणवे लागत असल्यामुळे फुलपाखरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, वणवा लावल्यानंतर गवत चांगले येते, ही मानसिकता संबंधित लोकांनी बदलायला हवी. प्रशासनाकडून वणव्या संदर्भात जनजागृती केली जाते. मात्र वणवे लागत नाहीत तर दुर्देवाने ते जाणूनबुजून लावले जातात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. वन्यप्राण्यांसोबत परिसरातील रहिवाशांच्या जीवासही धोका निर्माण होतो. संपूर्ण जंगल भस्मसात होत असताना गावेच्या गावे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे अमेरिकेतील वणवे पाहिल्यानंतर दिसून येते. शहर परिसरातील डोंगर परिसरात वणवे लागल्यानंतर ते विझवणारी यंत्रणा सातारा पालिकेने तैनात ठेवावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे जाळपट्टे तयार केल्यास वणव्यांना अटकाव करता येईल. अजिंक्यतारा किल्ला व परिसरात अशा पद्धतीने सातारा पालिका व वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

Post a Comment

0 Comments