मराठी भाषा गौरव दिन बिभवी शाळेत उत्साहात; डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने प्रचार, प्रसार व जनजागृती


मराठी भाषा गौरव दिन 

बिभवी शाळेत उत्साहात

दिवाणी व फौजदारी न्यायालय, कवी, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने प्रचार, प्रसार व जनजागृती

मेढा : जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बिभवी (ता. जावली) येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी बिभवी शाळेत दिवाणी व फौजदारी न्यायालय मेढा यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, ॲड. एन. एस. पवार, ॲड. ए. के. शेटे, प्रशांत इंगळे, कवयित्री जयश्री माजगांवकर, बिभवीचे सरपंच संतोष बांदल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, अध्यक्ष संदीप देशमुख, मुख्याध्यापक अशोक लकडे, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विक्रम आव्हाड म्हणाले, मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणे, तिचे संवर्धन करणे, प्रसार करणे व नव्या पिढीला मातृभाषेचा अभिमान वाटून देणे आवश्यक आहे. आपण सर्वजण मराठी भाषा जपण्याचा व तिचा अधिकाधिक वापर करण्याचा संकल्प करुया.

याप्रसंगी कवयित्री जयश्री माजगांवकर यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली. ॲड.पवार मॅडम आणि ॲड.शेटे मॅडम यांनी मराठी भाषेतील साहित्य आणि मराठीचा अभिमान याबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रशांत इंगळे यांनी कविता गायन केले. 

मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी प्रास्ताविकात कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषा गौरव दिनाची माहिती दिली. यावेळी न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड आणि उपस्थितांचे शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. दीपाली दुंदळे यांनी आभार मानले.

दुसऱ्या सत्रात लेखक आणि कवी आपल्या भेटीला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये दीपाली दुंदळे यांनी कवयित्री जयश्री जगताप, कवयित्री योगिता जगताप यांचा परिचय करून दिला. 

जयश्री जगताप व योगिता जगताप यांनी विद्यार्थ्यांना लेखन कसे करावे, कविता कशी तयार होते, याबाबत माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांकडून कविता करुन घेतल्या. योगिता जगताप यांनी विद्यार्थ्यांना ५१ पुस्तके भेट दिली. शाळेच्या वतीने या नवोदित कवयित्रींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

शेवटच्या सत्रात अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, वहागावच्या सरपंच सौ. संगिता शिराळे यांनी बिभवी शाळेला विशेष भेट दिली. त्यांनी आपल्या मनोगतातून मराठी साहित्यातील विविधता स्पष्ट करत मराठीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी शिक्षकांचा सत्कार केला आणि सर्व विद्यार्थ्यांना खाऊ आणि पेनचे वाटप केले.

अमिता एरंडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका दीपाली दुंदळे, अमिता एरंडे, अंगणवाडी सेविका स्नेहल देशमुख, सुमल बांदल व शालेय मंत्रिमंडळ यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments