कोयना धरणग्रस्तांच्या
पुनर्वसनाबाबत
मार्चच्या पहिल्या आठवड्यात
मंत्रालयात बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सकारात्मक : डॉ. भारत पाटणकर
सातारा : गेल्या २३ तारखेपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जावळी, महाबळेश्वर, पाटण, कोरेगाव, आणि इतर जिल्ह्यात विभागलेले कोयना धरणग्रस्त श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत, त्यानिमित्ताने आज अपर जिल्हाधिकारी श्री. मल्लिकार्जुन माने, पुनर्वसन अधिकारी श्री. मनोहर गव्हाड, पुनर्वसन तहसीलदार श्रीमती सनदे मॅडम, यांच्यासह सविस्तर बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ. भारत पाटणकर पत्रकार परिषदेत बोलत होते.
बैठकीस डॉ. भारत पाटणकर, संतोष गोटल, ऍड. शरद जांभळे, गणेश भिसे, प्रकाश साळुंखे, किसन सुतार, पांडुरंग लाड, श्रीपती माने, एकनाथ लाड, दाजी शेलार, आनंदा सपकाळ, रामभाऊ शेलार, ज्ञानबा भोसले, किसन जाधव, प्रभाकर चव्हाण, यांच्यासह प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले की, आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी झालेली बैठक सविस्तर झाली असून, मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या केस विषयी मूलभूत मुद्दे याची चर्चा झाली, यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती कोयना धरणग्रस्त विस्थापित झाले आहेत, त्यापैकी १९९० च्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात किती लोकांना जमीन वाटप करण्यात आले आहे, मूळ ठिकाणी जलाशयाच्या शेजारी किती प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप झाले आहे. दुबार किती लोकांना वाटप झाले आहे, अंशतः जमीन वाटप किती लोकांना झाले आहे, आणि अजिबात किती लोकांना वाटप झालेले नाही, याचा सर्व डेटा पुनर्वसन कार्यालयात नव्याने तयार केला आहे. त्याची आजपर्यंतची अपडेट कॉपी संघटनेला दिली जाणार आहे.
ते पुढे असेही म्हणाले की, कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय केंद्र मानून इतर सर्व जिल्ह्यातील संबंधित कार्यालयातील सक्षम अधिकारी बोलवून बैठका घेतल्या जातात, त्या बंद आहेत, त्याची पुढील बैठक ही सर्व जिल्ह्यांचा डेटा मागवून २५ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.
आंदोलन मागे घेण्याबाबत अपर जिल्हाधिकारी यांनी आवाहन केल्यावर डॉ. पाटणकर म्हणाले की, मंत्रालय पातळीवरच्या बैठकीचा अनुभव प्रकल्पग्रस्तांना वाईट आहे, त्यामुळे बैठकीचे पत्र मिळाले तरच लोक विश्वास ठेवतील, यानंतर लगेचच पुनर्वसन मंत्री यांचे स्वीय साहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आज संध्याकाळ पर्यंत मार्चच्या पहिल्या आठवड्यातील बैठकीची तारीख व वेळ देणार असे त्यांनी सांगितले. यावर डॉ. भारत पाटणकर यांनी पत्र मिळाल्यानंतर उद्या सकाळी आम्ही आंदोलन स्थगित करू, असे सांगितले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयात कोयना धरणग्रस्तांच्या विषयी जी याचिका दाखल आहे, त्याची उद्याच २६ तारखेला सुनावणी असून, त्या याचिकेतील उपस्थित मुद्याविषयी चर्चा होऊन पुढील काळात कोणती माहिती तयार ठेवावी लागणार याचीही चर्चा झाली, असे डॉ. पाटणकर शेवटी म्हणाले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!