वसंतराव मानकुमरे म्हणजे नौटंकी सुपारीबाज माणूस

वसंतराव मानकुमरेंनी ३० वर्षात

जनतेच्या प्रश्नांसाठी

किती आंदोलने केली?

शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांचा मानकुमरेंना रोखठोक सवाल


जावळीकरांना नोकरी देणाऱ्या दत्तात्रय भालेघरे यांनी ५०० लोकांची यादी जाहीर करण्याचे आव्हान


मेढा : माथाडी कामगार दत्तात्रय पवार- भालेघरे यांचे वकील पत्र, सुपारी घेऊन काम करणाऱ्या वसंतराव मानकुमरेंनी ३० वर्षात जनतेच्या प्रश्नांसाठी किती आंदोलने केली. पाच हजार लोकांना नोकरी देणाऱ्या पवारांनी ५०० लोकांची यादी जाहीर करावी, असे आव्हान करून मोर्चासाठी दोन वेळेचे जेवण, स्वेटर, जर्किंग, भेटवस्तूंचे वाटप व प्रत्येक गाडीला तीन हजार भाडं म्हणजे निषेध मोर्चा नव्हे, तर सवलतीचे पॅकेज आहे, अशी जोरदार टीका शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी केली. 


मेढा येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख शांताराम कदम, तालुका उपप्रमुख राजेश माने, शहरप्रमुख संजय सुर्वे, शिव उद्योग सेना तालुकाध्यक्ष सतीश पवार, सरंपच श्रीरंग गलगले, सूर्यकांत जाधव, दत्ता पोफळे, सतीश पवार आदी उपस्थित होते.


वसंतराव मानकुमरे यांच्यावर घणाघात करताना संदीप पवार म्हणाले, जावली तालुक्यातील सुपुत्राला महाराष्ट्रात मिळालेल्या पदाच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले असताना जावलीतील जनतेला त्याचा आनंदच आहे. परंतु ज्या माणसाची जावली तालुक्यात ओळख नाही, ज्याच्यावर एसआयटी चौकशी सुरू आहे अशा दत्तात्रय पवार- भालेघरेंबद्दल निषेध मोर्चे काढून काय साध्य होणार? असा प्रश्न उपस्थित करून वसंतराव मानकुमरे म्हणजे नौटंकी सुपारीबाज माणूस आहे.


पवार म्हणाले, जावलीतील सामान्य माणूस आजही वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणासाठी झगडत आहे. स्वतःच्या गावातील पानस, हातगेघर रस्ता गेली दहा वर्षे प्रलंबित आहे. आंबेघर, हातगेघर, कावडी रस्ता आजअखेर अपूर्ण आहे. कॅनॉलचे पाणी शेतात अजून पोहचले नाही. गत ४० वर्षे बावधन रस्ता रखडलेला आहे. महू - हातगेघर धरणाचा प्रश्न का सोडविता आला नाही, असे अनेक प्रलंबित प्रश्न बाजूला ठेवून मुंबईच्या वादाला जावलीत गुदमरवण्याचा संधीसाधूचा प्रयत्न मानकुमरे करत आहेत. ज्या व्यक्तीवर एसआयटी चौकशी सुरू आहे त्याच्या पाठीशी उभे राहणे हे कोणत्या नैतिकतेत बसतं? असा प्रश्न उपस्थित करून दत्तात्रय पवार- भालेघरे यांचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे असताना जावलीत मोर्चा कशाला? तसेच ही बाब संसदीय चौकशी अंतर्गत असताना त्याचा आवाज मुंबईच्या विधान भवनात निघाला पाहिजे. पण यांना तहसिल कार्यालय आणि विधानभवन याचा फरकच कळेना झालाय! म्हणजे याला मोर्चा म्हणायचा की मूर्खपणा? 


पवार म्हणाले, ४ ऑगस्ट रोजी जावलीतील तमाम जनतेच्या व सर्व पक्षांच्या वतीने जावलीतील एका सुपुत्राची महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असताना जावलीकर म्हणून सुसंस्कृत राजकारणी म्हणून अशा व्यक्तीचा सत्कार करणे किंवा अभिनंदन करणे हा संस्काराचा भाग आहे. मुंबई कार्यक्षेत्र असणाऱ्या नेत्यासाठी जावलीत मोर्चा काढणे म्हणजे तालुक्याचा अपमान आहे. जावलीच्या स्वाभिमानाचा सौदा करणाऱ्यांना जनता ओळखू लागली आहे. हा मोर्चा नसून वसंतराव मानकुमरेंच्या राजकीय आयुष्याची कृत्रिम श्वासयंत्रणा आहे. आज तुमचं मौन म्हणजे उद्याच पतन ठरेल. म्हणून जावळीकरांनो उठा, विचार करा आणि ढोंगी नेतृत्वाचा पर्दाफाश करा, असे आवाहन   पवार यांनी जनतेला केले.

Post a Comment

0 Comments