जुन्या वादातून धीरज ढाणेच्या
खुनासाठी २० लाखांची सुपारी
माजी नगराध्यक्षच्या मुलासह सहा जणांना पोलिसांनी केले अटक
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी निलेश वसंत लेवे व पप्पू लेवे या दोघांची भांडणे झाली होती. त्यावेळी निलेश लेवे याचे वडील वसंत लेवे (आण्णा) यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन निलेश वसंत लेवे याने संशयित आरोपी अनुश चिंतामणी यास धीरज ढाणे याचा खून करण्यासाठी २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यासाठी निलेश लेवे याने अनुश पाटील यास २ लाख रुपये ॲडव्हान्स दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संशयित आरोपी निलेश वसंत लेवे (रा. चिमणपुरा पेठ सातारा), विशाल राजेंद्र सावंत (रा. टिटवेवाडी, ता. जि. सातारा) यांनाही अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या मंगळाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासमोर असलेल्या मैदानात काही व्यक्ती जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळताच बीट मार्शल २ वर कार्यरत असणारे पोलीस अंमलदार तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. तेथे गेल्यानंतर त्यांना काही व्यक्ती उभे असल्याचे दिसले. त्यातील व्यक्तींच्या हातात लोखंडी सुऱ्यासारखी हत्यारे दिसल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष सातारा येथे स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण विभाग येथील जादा मनुष्यबळ घटनास्थळी पाठविण्याबाबत कळविले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
यावेळी घटनास्थळावर अनुज चिंतामणी पाटील (वय २१, रा. २६७ गुरुवार पेठ सातारा), दीप भास्कर मालुसरे (वय १९, रा.१६४ गुरुवार पेठ, शिर्के शाळेजवळ सातारा,) आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय २५, रा. हनुमाननगर इचलकरंजी कोल्हापूर), अक्षय अशोक कुंडूगळे (वय २५, रा. जवाहरनगर इचलकरंजी कोल्हापूर), क्षितीज विजय खंडाईत (रा. गुरुवारपेठ सातारा) या व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील २ देशी बनावटीची पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या, २ मोटारसायकल, २ लोखंडी सुरे, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ४ लाख ४१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबत यांच्याकडे विचारणा केली असता ते सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरी करणार होते, असे सांगितले. त्यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्यातील संशयित आरोपी अनुज चिंतामणी पाटील याच्याकडे अधिक विचारपूस करत असताना त्याने सांगितले की, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले, त्यावेळी निलेश वसंत लेवे व पप्पू लेवे या दोघांची सातारा शहरात भांडणे झाली होती. त्यावेळी निलेश लेवे याचे वडील वसंत लेवे (आण्णा) यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारले होते. याचा राग मनात धरुन निलेश वसंत लेवे याने संशयित आरोपी अनुश चिंतामणी यास धीरज ढाणे याचा गेम करण्यासाठी २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यासाठी निलेश लेवे याने अनुश पाटील यास २ लाख रुपये ॲडव्हान्स दिला होता, असे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार संशयित आरोपी निलेश वसंत लेवे (रा. चिमणपुरा पेठ सातारा), विशाल राजेंद्र सावंत (रा. टिटवेवाडी, ता. जि. सातारा) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ११७ देशी बनावटीची पिस्टल, ४ बाराबोअर रायफल, २ रायफल, २६६ जिवंत काडतुसे, ३८८ रिकामी काडतुसे, ५ रिकामे मॅग्झीन जप्त केली आहेत. आज त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे, शिवाजी भोसले, दत्तात्रय दराडे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, अजय जाधव, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, सचिन ससाणे, विशाल पवार, रोहित निकम, रविराज वर्णेकर, मोनाली निकम, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, विनायक मानवी, तुषार भोसले, सागर गायकवाड, होमगार्ड इंगळे यांनी कारवाई केली आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!