मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख : उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष
एकनाथ शिंदे साहेब यांच्या
वाढदिवसादिनी उपमुख्यमंत्री
वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना
ना वशिला - ना ओळख; रुग्णांच्या सेवेसाठी निःशुल्क मदत आणि मार्गदर्शन उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे ब्रीदवाक्य
मुंबई : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना ९ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून नेमके कामकाज कसे चालणार या अनुषंगाने अनेक वैद्यकीय सहाय्यक/ रुग्ण सेवकांकडून विचारणा होत आहे. या संदर्भात खालील संक्षिप्त माहिती देत आहोत.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे.या कक्षाच्या माध्यमातून राज्याची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मोफत रूग्ण सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार हे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ध्येय व उद्दिष्ट आहे. त्यानुसार गरजू - गोरगरीब रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करून देण्यासाठी या कक्षातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसाह्य वितरित केले जाणार नाही. परंतु, राज्यात लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, तसेच धर्मादाय रुग्णालय योजना , राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांसह केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा कसा देता येईल ? त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार कसे करता येतील,यासाठी समन्वयाची भूमिका पार पाडली जाणार आहे.
थोडक्यात, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा आरोग्य विषयक योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी दुवा म्हणून कामकाज पाहणार आहे. यासोबतच अतिशय महागड्या असलेल्या अवयव प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया यांच्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संबंधित गरजू रुग्णांसाठी अर्थसहाय्य उभे केले जाणार आहे. यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट (मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) , लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) हार्ट ट्रान्सप्लांट (हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) , हँड ट्रान्सप्लांट (हस्त प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) आदी महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश असणार आहे
विशेषतः जी लहान मुले थेलेसीमिया मेजर आजाराने ग्रस्त आहेत अशा मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी तसेच जन्मतः कर्णबधिर व मुकबधिर असलेल्या मुलांच्या कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रियांच्यासाठी अर्थसहाय्य उभे करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आधी संस्थांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उभे करण्यासाठी समन्वय साधला जाणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा यावर्षी साठावा वाढदिवस असल्याने हे संपूर्ण वर्ष उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि तालुक्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून निदान झालेल्या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
एकनाथ हिरक आरोग्य वर्ष निमित्ताने राज्यभरातील ६००० दिव्यांग बांधवांना मोफत मॉड्युलर हात किंवा पाय यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच या संपूर्ण वर्षात ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे अशांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटल तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये मोफत केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियासाठी ठाणे शहरात येणाऱ्या रुग्णांना येण्या - जाण्याचा प्रवास खर्च दिला जाणार असून ठाणे येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील मोफत केली जाणार आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!