सातारा विधानसभेसाठी
अमित कदम यांची महाविकास
आघाडीकडून उमेदवारी निश्चित
अमित कदमांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश; एबी फॉर्मदेखील मिळाला
मुंबई : महायुतीने यापूर्वीच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केली असून, ते प्रचारालासुद्धा लागलेले आहेत. मात्र, या घडामोडीत महाविकास आघाडीची तळ्यात-मळ्यात भूमिका होती. अखेर आज रविवारी ही भूमिका महाविकास आघाडीने स्पष्ट केली. प्रथम अमित कदम यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन सन्मानपूर्वक शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने उमेदवारी लढवण्यासंदर्भात एबी फॉर्मदेखील दिला असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध अमित कदम असा दुरंगी सामना रंगणार आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, महाविकास आघाडीने मात्र उमेदवार ठरवण्यात विलंब केला. त्याबाबत शनिवार, रविवार मुंबई येथे महाविकास आघाडीमध्ये अनेक राजकीय खलबते झाली. प्रामुख्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाईल असे राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सोडला गेल्याने दोन दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी मुंबईमध्ये घडल्या. शिवसेनेकडून इच्छुक असलेले जिल्हाप्रमुख सचिन मोहिते व एस. एस. पार्टे यांची पक्षाने अखेर समजूत काढीत ही उमेदवारी अमित कदम यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. एकसंघपणे महाविकास आघाडीने सातारा विधानसभेत आपली ताकद दाखवावी, अशा सूचनाही पक्षश्रेष्ठंकडून प्रमुख नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
सातारा विधानसभा मतदारसंघातील हा सामना आता महायुतीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीकडून अमित कदम असा दुरंगी होणार आहे. अमित कदम यांचा राजकीय 'कस' या निवडणुकीत पणाला लागणार आहे. एकीकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघात उभा केलेला विकासाचा डोंगर त्यांच्यासोबत प्रमुख कार्यकर्ते संस्था, ग्रामपंचायतीदेखील त्यांचाच ताब्यात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अमित कदम यांना तितकी सोपी नसणार आहे. अमित कदम यांना सर्वांना सोबत घेऊन या निवडणुकीत सर्व शक्तींनिशी उतरावे लागणार हे मात्र निश्चित!
"महाविकास आघाडीने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करून दाखवेन. कॉग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन मतदारसंघात पुढील दिवसांमध्ये विजयाच्या दृष्टीने रणनीती आखली जाईल."
- अमित कदम, महाविकास आघाडी उमेदवार
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!