महिला भगिनींनी भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे

 


महिला भगिनींनी भाजपाच्या 

पाठीशी ठामपणे उभे राहावे

भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचे आवाहन

सातारा : आपले चौथे महिला धोरण राज्य शासनाने जाहीर केले आहे. समाजाचा मूळ आधार असलेल्या महिला भगिनींचा योग्य सन्मान साधण्याचा आटोकाट प्रयत्न महायुतीच्या सरकारने केलेला आहे. महिलांनी विविध आघाड्यांवर काम करताना आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल अशी किर्ती मिळवावी, असे गौरवोदगार भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी काढून लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांगिण विकासाकरीता कटिबध्द असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी महिला भगिनींनी ठामपणे उभे राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

सातारा जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात केले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. चित्रा वाघ या बोलत होत्या.

यावेळी सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने-कदम, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. गितांजली कदम व माजी नगराध्यक्षा सौ. रंजना रावत, सौ. सुवर्णाताई पाटील, सौ. समता मनोज घोरपडे, तेजस्वीनी घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चनाताई देशमुख, सुनीशा शहा, कविता कचरे, वैशाली भिलारे आदी मान्यवर पदाधिकारी, प्रमुख उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्षा आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. रंजना रावत म्हणाल्या, महिला भगिनींच्या कायम पाठीशी असणाऱ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवर कधीही अविश्वास दाखवलेला नाही. एखादी महिला हे करु शकणार नाही अशी नकारात्मक मानसिकता महाराजसाहेबांकडे नाही. जातीधर्माच्या आणि स्त्री-पुरुष भेदाच्या पलिकडे विकासाचा दृष्टीकोन असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या प्रयत्नामधूनच नारी शक्ती वंदना हा महिला भगिनींच्या सन्मानाचा कार्यक्रम होत आहे.

भाजपा महिला आघाडी प्रदेश संघटक आणि रहिमतपूर पंचक्राशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास उलगडताना, गगनाला गवसणी घालण्याची क्षमता नारीमध्ये आहे. नारीशक्तीशिवाय जग अपूर्ण आहे. जिजाऊ माँसाहेबांमुळे शिवबा घडले त्यांनीच पुढे इतिहास निर्माण केला. त्याच पध्दतीने जिद्दीने आपण समाजासाठी अखंड कार्यरत राहूया. आजचा नारी सन्मान अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. कार्यक्रमास सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आवर्जुन उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते सौ. चित्रा वाघ यांचे माँसाहेब जिजाऊ आणि बालशिवबा यांची प्रतिमा भेट देऊन सातारकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच महिला भगिनींच्या मनाप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.


यावेळी सौ. चित्राताई वाघ यांनी हमारा नेता कैसा हो उदयनमहाराज जैसा हो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषण दिल्या. त्यावेळी सभागृह दणाणून गेले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक सुनील काटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, काका धुमाळ, युवा नेते संग्राम बर्गे, भाजमाचे चिन्मय कुलकर्णी, पंकज चव्हाण, मनीषताई पांडे, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडीक आणि स्मिताताई घोडके, शाजपा शहराध्यक्ष व माजी नगरसेवक विकास गोसावी, रविंद्र लाहोटी यांच्यासह बहुसंख्य महिला भगिनी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुवर्णाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. चित्रा वाघ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. नारी शक्ती वंदना कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरभिताई भोसले यांनी केले. आभार अर्चनाताई देशमुख यांनी मानले. संतोष कणसे यांनी सूत्रसंचालन केले.


उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळावी

सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे काम करीत असताना, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां महिला भगिनींच्या समन्वयामधून शासनाच्या योजना जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि तळागाळापर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. आमच्या प्रयत्नांना सातारा जिल्ह्याचे नेते आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातत्याने सहकार्य केले आहे. आम्हा महिला भगिनींच्या पाठीशी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे नेहमीच मोठ्या भावासारखे खंबीरपणे उभे राहात आलेले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार म्हणून समोर आणि व्यासपिठावरील बसलेल्या महिला भगिनींच्या मनातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळावी, अशा भावना आहेत. या भावना वरिष्ठ पातळीवर आपण पोहोचवाव्यात, अशी आग्रही मागणी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले यांनी सौ. चित्राताई वाघ यांच्याकडे आवर्जुन केली.

Post a Comment

0 Comments