साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी सराव केंद्र उभारावे

 


साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे 
आर्चरी सराव केंद्र उभारावे 


उदयनराजे भोसले यांची केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्याकडे मागणी 


सातारा : जिल्ह्यात शेकडो खेळाडू आर्चरी खेळाचा सराव करत असून सातारा जिल्हा आर्चरी खेळातील महत्वाचे केंद्र होऊ पहात आहे. आर्चरी सरावासाठी अद्ययावत शासकीय केंद्राची आवश्यकता आहे. भविष्यात ऑलिंपिक पदके मिळवून देण्याची क्षमता आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने याबाबत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी सराव  केंद्र उभारण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय क्रीडामंत्री ना. अनुरागसिंह ठाकूर यांची समक्ष भेट घेऊन केली. 


नुकत्याच आर्चरी खेळामध्ये सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले आदिती स्वामी व ओजस देवतळे यांना अर्जुन पुरस्कार घोषित झाल्याने आज केंद्रीय क्रिडामंत्री अनुरागसिंह ठाकूर यांची भेट घेवून निवेदन दिले.

निवेदनात उदयनराजे यांनी म्हटले आहे की,  सातारा जिल्ह्यातील आदिती स्वामी, ओजस देवताळे या दोघांच्या दैदिप्यमान कामगिरीबरोबरच पार्थ सुशांत साळुंखे हा यूथ वर्ल्ड चॅम्पियन झालेला पहिला भारतीय खेळाडू सुध्दा सातारा जिल्ह्यातील आहेत. या सर्वांच्या अभिनंदनीय  कामगिरीवर व्यक्तीश: आम्हाला तसेच सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नागरिकांना या खेळाडूंचा सार्थ अभिमान आहे. या गुणी खेळाडूंना पायाभूत सुविधा योग्य पध्दतीने मिळाल्यास, त्यांना आपला क्षमता सिध्द करण्याची संधी मिळणार असल्याने, सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी आधुनिक सुविधा असलेले क्रीडांगण व स्टेडियम उभारावे. याचबरोबरच सातारा शहरातील छ. शाहु स्टेडियम येथे सिंथेटिेक ट्रॅक व कलायबिंग वॉल व पायाभूत सुविधा केंद्र शासनाचा माध्यमातून उपलब्ध करून मिळावे, अशी विनंतीसूचना उदयनराजे भोसले यांनी केली.

दरम्यान, अनुरागसिंह ठाकूर यांनी आदिती स्वामी व ओजस देवताळे या दोन अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामार्फत अभिनंदन केले आहे. यासंदर्भात केंद्रशासनाच्या माध्यमातून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनांनुसार सकारात्मकतेने योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही दिले.

Post a Comment

0 Comments