गोडोलीत सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम; पोवई नाका ते साईबाबा मंदिर, गोडोली जकात नाका परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनांची तयारी


गोडोलीत सोमवारपासून

अतिक्रमण हटाव मोहीम

पोवई नाका ते साईबाबा मंदिर, गोडोली जकात नाका परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनांची तयारी

सातारा | प्रतिनिधी

गोडोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सातारा नगरपालिकेने अखेर ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. १० ऑगस्टपासून गोडोली परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. पोवई नाका ते साईबाबा मंदिर तसेच गोडोली जकात नाका परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

गोडोली परिसरातील रस्त्यांच्या कडेला झालेली अतिक्रमणे, अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे या मार्गावर नागरिकांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पोवई नाका ते साईबाबा मंदिर आणि गोडोली जकात नाका परिसरात सकाळी व सायंकाळच्या वेळेत वाहतुकीचा मोठा ताण जाणवत आहे. त्यातच पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गांवर तसेच गोडोली चौक परिसरात वाहतुकीचा भार वाढला आहे. या भागात शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये असल्याने विद्यार्थी, पालक, रुग्ण, वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शनिवारी गोडोली परिसराची पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील अतिक्रमणे, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. पाहणीनंतर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेबरोबरच गोडोली परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ तात्पुरत्या उपायांनी न सोडविता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वाहतुकीचे नियमन, रस्त्यावरील अडथळे दूर करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

या पाहणीदरम्यान सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेवक फिरोज पठाण, विनोद मोरे, रवी पवार, नगरसेविका अनिता फरांदे, पूनम निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरभट, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, शहर विकास विभागाचे नगररचनाकार तुषार मदने, क्षितिज शिंदे, सातारा नगरपालिका बांधकाम विभागाचे विनोद दहिफळे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह अधिकारी, वाहतूक पोलीस आणि नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नागरिक तसेच व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गोडोली परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याने या मोहिमेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments