पिंपोडे-शिरगाव घाटात ट्रक-पिकअपचा अपघात; पिकअप उलटल्याने वाहतूक विस्कळीत; महामार्ग पोलिसांसह स्थानिकांची घटनास्थळी धाव

पिंपोडे-शिरगाव घाटात

ट्रक-पिकअपचा अपघात

पिकअप उलटल्याने वाहतूक विस्कळीत

महामार्ग पोलिसांसह स्थानिकांची घटनास्थळी धाव

कोरेगाव | प्रतिनिधी 


वाई तालुक्याला कोरेगाव तालुक्याशी जोडणाऱ्या मार्गावरील पिंपोडे-शिरगाव घाटात गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) ट्रक आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहन रस्त्यावर उलटले असून ट्रकचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.


घाटातील वळणाच्या ठिकाणी ट्रक आणि पिकअप वाहनांच्या धडकेनंतर पिकअप वाहन रस्त्यावर आडवे उलटल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. रस्त्यावर उलटलेल्या पिकअपमुळे वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. 


पिंपोडे-शिरगाव घाटातील हा मार्ग वाई आणि कोरेगाव तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. घाटातील वळणे, अरुंद रस्ता आणि वेगामुळे या मार्गावर अपघाताचा धोका असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, या अपघातात नेमके किती जण जखमी झाले किंवा जीवितहानी झाली आहे का? याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलीस तपासानंतर अपघाताचे नेमके कारण आणि नुकसानीची माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments