कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणपादुकांचे पूजन करावे : त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्ष ललिता संदीप शिंदे (देशमुख) यांची मागणी

नाशिकच्या कुंभमेळ्याच्या 

धर्म ध्वजारोहणावेळी 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 

चरणपादुकांचे पूजन करावे

त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्ष ललिता संदीप शिंदे (देशमुख) यांची मागणी 

सातारा : प्रतिनिधी

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणपादुकांचे साधू-संत व महंतांच्या मंत्रोच्चारात पूजन करण्यात यावे, अशी मागणी सौ. ललिता संदीप शिंदे (देशमुख) यांनी पत्रकार परिषदेत केली. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होणार असल्याचे उपलब्ध माहितीत नमूद आहे.

भगवान त्र्यंबकेश्वराचे वतनदार यांच्या वारस व त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वस्त असलेल्या ललिता शिंदे यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याची परंपरा आक्रमकांच्या काळात खंडित झाल्यानंतर छत्रपती शहाजी महाराजांनी साधू-संतांना अभय देत ही परंपरा पुन्हा सुरू केल्याचे धार्मिक व ऐतिहासिक दाखले आहेत.

महाराष्ट्र आणि भारतातील जनता छत्रपती महाराजांच्या गादीची सदैव ऋणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मरक्षणाच्या कार्याचे स्मरण म्हणून त्र्यंबकेश्वर-नाशिक महाकुंभाच्या माध्यमातून त्यांच्या पवित्र चरणपादुकांचे गोदावरी तीर्थाने पंचामृतरूपाने पूजन करण्यात यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस असलेल्या संबंधित छत्रपती महाराजांच्या शुभहस्ते हे पूजन व्हावे, अशी कळकळीची विनंती आपण केली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

या उपक्रमाची संकल्पना इतिहासतज्ज्ञ श्री. सतीश सातोणकर यांची असून, सौ. ललिता संदीप शिंदे (देशमुख) यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी मांडली.



Post a Comment

0 Comments