संग्रहित छायाचित्र
कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
आज सायंकाळी ५ वाजता
सहा दरवाजे उघडणार
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सातारा / प्रतिनिधी
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणाचा एकूण (ग्रॉस) पाणीसाठा ८३.९५ टीएमसी (७९.७६%), तर उपयुक्त (लाइव्ह) पाणीसाठा ७८.८३ टीएमसी (७८.७३%) इतका झाला आहे. धरणाची पाणीपातळी २१४५ फूट ७ इंच (६५३.९७४ मीटर) नोंदविण्यात आली आहे.
सध्या कोयना धरणात १८,१०७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (३० जुलै) सायंकाळी ५ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उघडून ५,०७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीत एकूण ६,१२९ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे.
कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास आणि धरणातील येवा वाढल्यास सांडव्यावरील विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच ग्रामपंचायत, महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत कोयना येथे ४३ मिमी, तर नवजा येथे ५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे तांत्रिक कारणामुळे पावसाची दैनंदिन नोंद उपलब्ध नसली, तरी एकूण हंगामी पाऊस ३४८५ मिमी इतका झाला आहे.
महत्त्वाचे आकडे
कोयना धरण पाणीपातळी : २१४५'०७"
ग्रॉस स्टोरेज : ८३.९५ टीएमसी (७९.७६ टक्के)
लाइव्ह स्टोरेज : ७८.८३ टीएमसी (७८.७३ टक्के)
आवक : १८,१०७ क्युसेक
सायं. ५ नंतर एकूण विसर्ग: ६,१२९ क्युसेक
कोयना पाऊस : ४३ मिमी
नवजा पाऊस : ५१ मिमी
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!