सातारा हिल हाफ मॅरेथॉन ६ सप्टेंबरला होणार


सातारा हिल हाफ मॅरेथॉन

६ सप्टेंबरला होणार

ऑनलाइन रजिस्ट्रेशन दि. ६ एप्रिलपासून सुरू


दोन टप्प्यांत रजिस्ट्रेशन, मोफत प्रशिक्षण


सातारा : पुनित बालन ग्रुप सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२६ यावर्षी रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन रजिस्ट्रेशन आज दि. ६ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वेळेस दोन टप्प्यांत रजिस्ट्रेशन होणार आहे.

रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सुरु होणार असून गुरुवारी दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा टप्पा खुला असणार आहे. यासाठी सर्वप्रथम www.runsatara.com या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रोफाईल बनवायचे आहे. यामध्ये आपण आपले संपूर्ण नांव, पत्ता, मोबाइल क्रमांक, ई मेल, टी शर्ट साईज, स्त्री / पुरुष, जन्मतारीख इत्यादी तपशील भरायचा आहे. या पहिल्या टप्प्यात वरील सर्व माहिती भरुन पूर्व नोंदणी करायची आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यात आपण प्रवेश शुल्क भरायचे नाही. ज्या स्पर्धकांनी पहिल्या टप्प्यात ही नोंदणी केली आहे, फक्त त्यांनाच दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करता येईल. हा दुसरा टप्पा रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सुरु होईल. मात्र, प्रवेश संख्येवर मर्यादा असल्यामुळे जागा उपलब्ध असेपर्यंतच ही संधी असेल याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या दुसऱ्या टप्प्यात त्याच संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून प्रवेश शुल्क भरून त्यांना स्पर्धेत सहभाग निश्चित होणार आहे.‌

ज्या धावपटूंनी गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी केली होती, त्यांची पहिल्या टप्प्यातील प्रोफाइल माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित स्पर्धकांनी पहिल्या टप्प्यामधील माहिती अर्थात नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी वैयक्तिक माहिती पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. परंतु, पहिल्या टप्प्यामधील उर्वरित माहिती त्यांनी भरावयाची आहे. यामध्ये यावर्षीची नोंदणी करताना केवळ टी शर्ट साईज, गेल्या वर्षी किती वेळात स्पर्धा पूर्ण केली, त्याचे टायमिंग व इतर आवश्यक माहिती भरावयाची आहे. ज्या स्पर्धकांचे आधारकार्ड सातारा जिल्ह्यातील आहे, त्यांना ‘स्थानिक धावपटू’ मानण्यात येईल व त्यांना प्रवेश शुल्कात ३० टक्के सवलत असणार आहे.

या मॅरेथॉनची ऑनलाइन नांव नोंदणी करताना प्रत्येक स्पर्धकाने आपल्या रहिवासी दाखल्यासाठी आपले आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या नोंदणीसाठी एका ई मेल व एका मोबाइल क्रमांकावरून फक्त एकच नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी www.runsatara.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. नावनोंदणी केलेल्या धावपटूंसाठी दरवर्षीप्रमाणे १६ आठवड्यांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम याही वर्षी आयोजित केला आहे. त्याची सुरूवात दि. १७ मे रोजी सकाळी ५.४५ वाजता पोलिस परेड ग्राऊंडवरुन होईल, अशी माहिती या वर्षीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे यांनी संयोजन समितीच्या वतीने दिली.‌

Post a Comment

0 Comments