मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर
शाळा उपक्रमात मोठा गफला
गुणदानात अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ
कृषिरत्न विश्वंभर बाबर यांचा आरोप
सातारा : राज्य शिक्षण विभागाने शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमामधील गुणदानामध्ये मोठा गफला झाला आहे. मोठ्या रकमेचे बक्षीस संगनमताने आपापसात लाटण्याचा सावळा गोंधळ झाल्याचा आरोप कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
खाजगी व्यवस्थापन शाळा गटात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन भिन्न तपासणी पथकापैकी एका पथकाने दुय्यम शाळांना अवास्तव व ज्यादा गुण दिल्याने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळा म्हसवड या आपल्या शाळेवर अन्याय झाल्याचा आरोप विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी जिल्हा समिती अध्यक्षपदी असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्याकडे लेखी मागणी करूनसुद्धा त्यांनी चौकशी व फेर मूल्यांकनासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप विश्वंभर बाबर यांनी केला आहे. या प्रकारातील ज्यादा गुण देणारे पथक कोणते व त्यातील अधिकारी कोण? तसेच त्यांच्या कार्यक्रमाबद्दल शंका निर्माण झाली आहे. या तपासणीत दर्जेदार शाळेवर अन्याय तर दुय्यम शाळेला जादा गुण दिल्यामुळे तपासणी पथकातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण झालेली आहे. तपासणी अधिकाऱ्याच्या मनमानीपणामुळे व भ्रष्ट प्रवृत्तीमुळे शासनाची एक चांगली योजना बदनाम होत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांची सर्वांगीण दृष्ट्या प्रगती साधण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन 2025-2026 सुरू केला आहे. सध्या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी 200 गुणासाठी शाळांची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर तुलनात्मकदृष्ट्या तपासणी करून गुणदान केले जाते. या प्रत्येक स्तरासाठी शासनाने पहिल्या तीन शाळांना बक्षिसाची मोठी रक्कम ठेवलेली आहे. या स्पर्धेसाठी शासकीय व खाजगी व्यवस्थापन संस्थेच्या शाळा असे दोन स्वतंत्र गट तयार केलेले आहेत. या दोन्ही गटातून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रत्येकी पहिले तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीसाची मोठी रक्कम जाहीर केलेली आहे. सातारा जिल्हास्तरावर 11 तालुक्यातून शासकीय विभागातील क्रमांक एकच्या 11 व खाजगी व्यवस्थापनाच्या 11 शाळा जिल्हास्तरावर गुणदानाद्वारे निवडण्यात आल्या. वरील दोन्ही गटाच्या शाळांचे गुणदान एका पथकाऐवजी दोन भिन्न पथकाद्वारे करण्यात आले. प्रामुख्याने खाजगी व्यवस्थापन शाळा गटात अधिकाऱ्यांनी गुणदानात मोठा सावळा गोंधळ तर स्पष्ट सांगायचे झाल्यास मोठा दुजाभाव केलेला आहे. दोन पैकी एका पथकाने सढळ हाताने व गैर मार्गाने कोणताही पुरावा न पाहता गुणदान केले, तर दुसऱ्या पथकाने अत्यंत काटेकोर गुणदान केले. प्रथम क्रमांक शाळेला 11 लाख रुपये, द्वितीय क्रमांका साठी 5 लाख तर तृतीय क्रमांकसाठी 3 लाख रुपयाचे बक्षीस असल्याने संगनमताने अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराला व गैरमार्गाला मोठा वाव मिळालेला आहे. शाळेचे गुणदान ऑफलाइन व ऑनलाईन व सक्षम पुराव्यानिशी गुणदान करण्याचे धोरण असताना सुद्धा तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी कोणतीही गुणवत्ता पडताळणी न करता, कागदोपत्री पुरावा न पाहता, डोळे झाकून दुय्यम शाळांना ज्यादा गुण दिल्याने खऱ्या दर्जात्मक शाळेवर अन्याय झाल्याचा खात्रीशीर आरोप विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
या स्पर्धेतील खाजगी व्यवस्थापन गटातील क्रमांक एकची शाळा विभागासाठी पाठवली मात्र दुसरा व तिसरा क्रमांक आजअखेर जाहीर केलेला नाही. गोपनीय सूत्रानुसार एकाच पथकाने तपासणी केलेल्या एकाच विभागातील शाळांचे सर्व नंबर गैरमार्गाने काढलेले आहेत. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड या शाळेने गतवर्षी जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकविला होता. केवळ दोन गुणांनी शाळेचा पहिला क्रमांक गेला होता. क्रांतिवीर शाळा व्यवस्थापनाने यावर्षी भक्कम तयारी केली होती ती केवळ प्रथम क्रमांकासाठी केली होती. मात्र, अधिकाऱ्याच्या भोंगळ गैरकारभाराचा व अयोग्य गुणदानाचा फटका या शाळेला बसला आहे. सातारा जिल्हा खाजगी व्यवस्थापन प्रवर्गातील कोल्हापूर विभाग स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची पाठवलेली शाळा तपासणी व गुणात स्पर्धेत खूपच मागे राहिली. सदर शाळेच्या निवडीबद्दल शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागीय तपासणी पथक यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केल्याचे गोपनीय माहिती आहे.
एकंदरीत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमाच्या खाजगी व्यवस्थापन प्रवर्ग गटात गैर गुणदान प्रक्रियेमुळे तसेच अधिकाऱ्याच्या संगनमतामुळे जिल्हास्तरीय विश्वासहारतेचा व रास्त गुणदानाचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. मोठे बक्षीस व अधिकाऱ्याचे शंकास्पद गुणदानामुळे शासनाची चांगली योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावाजलेल्या आहेत. राज्यस्तरावर त्यांचा नुकताच सन्मान होतोय, मात्र केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याऐवजी कनिष्ठ स्तरावरील भ्रष्ट यंत्रणेवर वचक ठेवणे गरजेचे आहे. परिस्थितीचे भान ओळखून सामान्य जनतेला न्याय देणे सुद्धा महत्त्वाचे आहे. या स्पर्धेतील चुकीच्या गुणदान प्रक्रियेबद्दल मी त्यांच्याकडे लेखी तक्रार देऊनसुद्धा त्यांनी भ्रष्ट तपासणी पथकाला पाठीशी घातली आहे, तसेच दुर्लक्ष करून त्यांनी तपासणी पथकातील अधिकाऱ्याकडे कानाडोळा का केला? तपासणी पथकातील भ्रष्ट अधिकारी कोण? त्यांची प्रशासकीय पार्श्वभूमी काय? त्यांना संगनमताने पाठीशी घालण्याचे नेमके गुपित काय? इतर जिल्हा परिषदेत व विभागीय स्तरावर चौकशी केली असता सर्व पथकाच्या अधिकाऱ्यांनी समोरासमोर बसून प्रत्येक मुद्दानिहाय पुरावा पाहून चर्चा करून, आवश्यक पुरावा पडताळणी करूनच गुणदान केले आहे. मात्र, सातारा जिल्हा परिषद स्तरावर हे का झाले नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंधारात ठेवले. त्यांनी ही कनिष्ठ अधिकाऱ्यावर वास्तव विश्वास ठेवला ही वस्तुस्थिती आहे. एकूणच म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकवता कामा नये. चुकीला चूक म्हणण्याची धारिष्ट याशीनी नागराजन यांनी दाखवावे. एकूणच या उपक्रमाबाबत विश्वंभर बाबर यांनी शंका व्यक्त केली असून एकूणच हे प्रकरण एवढ्यावर न सोडता शिक्षण आयुक्त पुणे, मा. शिक्षणमंत्री तसेच मुख्य आयुक्त मंत्रालय मुंबई यांच्याकडे हे लावून धरणार असल्याचे सांगितले. जिल्हास्तरावर खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचे फेर मूल्यांकन करावे, अशीही मागणी विश्वंभर बाबर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!