गाव विकासाच्या "पाडळी
पॅटर्न"साठी ग्रामस्थ एकवटले
सातारारोड : साधारणतः चार वर्षांपूर्वी पाडळी- सातारारोड गावाचे ग्रामदैवत जरंडेश्वराची सेवा करण्याकरता काही मंडळी एकत्र आली. जरंडेश्वर मंदिर व परिसराची सुधारणा करण्याचा निर्धार व्यक्त केला. देव, मानव, पशु, निसर्ग व वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा विचारातून अबाल, वृद्ध काम करू लागली.
या ग्रुपला काहीतरी नाव देणे आवश्यक वाटल्याने त्यांनी जय जरंडेश्वर जिर्णोद्धार ग्रुप ची स्थापना केली. मंदिर परिसर स्वच्छ करण्याबरोबरच सुरुवातीला डोंगरावरच्या महाप्रसाद इमारतीची दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आले.
बाराशे फूट उंचीवरील मंदिर परिसरातील या इमारत दुरुस्तीसाठी वेगवेगळे साहित्य घेऊन दुरुस्ती करणे हे अतिशय मोठे अवघड काम होते पण गावकरी मोठ्या संख्येने सेवेसाठी एकत्र आले आणि हे काम लीलया पार पाडले आणि येथूनच सुरू झाला ग्राम सुधारण्याचा झंझावात. डोंगरावरील महाप्रसाद इमारत दुरुस्तीनंतर पायथ्याशी असणारे भक्तनिवास वापरता योग्य करण्यासाठी तेथील दुरुस्ती हातात घेऊन ती पूर्ण करण्यात आली.
यानंतर जरंडेश्वर पायथा ते पाडळी गाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोलर लाईट बसवण्यात आले. थोड्या दिवसानंतर माननीय आमदार महेश शिंदे व माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या निधीतून गाव ते पायथा हा पक्का, रुंद रस्ता बनवण्यात आला.
यानंतर या ग्रामस्थ मंडळींनी जरंडेश्वर डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे काम हाती घेतले. लावलेले वृक्ष अतिशय काळजीपूर्वक जोपासण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कोरेगाव वन विभागाच्या सहाय्यातून जरंडेश्वर पायथ्यास मोठ्या प्रमाणात भाविकांना विश्रांती घेता येईल अशाप्रकारे सुशोभीकरण करण्यात आले. वारकऱ्यांच्या स्वागता असणाऱ्या कमानीचे सौंदर्य वाढवण्यात आले.
पायथ्या पासून 200 फूट उंचीवर असणाऱ्या आंगठेश्वरच्या पासून जरंडेश्वर प्रदक्षिणा मारण्याकरता परिक्रमा मार्ग असावा अशी सूचना ग्रामस्थांनी वनखात्यास केली. वन खात्याने ही सूचना अतिशय तातडीने अमलात आणून त्याची सुरुवात केली.
या परिक्रमा मार्गावर वन खात्याने पक्षी व परिसर न्याहाळता यावा म्हणून उंच मनोरा उभारला तर गावकऱ्यांनी या परिक्रमा मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे काम हाती घेतले. याच वेळी वन खात्याने सुद्धा जरंडेश्वर डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. वनसंपत्ती राखण्याकरता सुरक्षारक्षक नेमले.
जरंडेश्वर डोंगरावर श्रावण महिन्यात असणाऱ्या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा भावीकांकडून केला जातो. ग्रामदैवताचे पवित्र राखण्याकरता जय जरंडेश्वर ग्रुप च्या माध्यमातून या काळात सतत स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या व प्लॅस्टिक मुक्ती आव्हान करण्यात आले.
या सर्व उपक्रमात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा सहभाग वाढला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी या सुधारणा करता होणाऱ्या मीटिंगमध्ये हळूहळू जरंडेश्वर सुधारणा बरोबरच गावातली इतर प्रश्न उपस्थित होऊ लागले. अतिशय शिस्त, मोठी यंत्रणा कार्यरत झाल्यामुळे या सर्व मंडळींनी गावच्या या प्रश्नात लक्ष घालू व ते सोडवू अशी भूमिका घेतली.
यातूनच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची सत्कार, परिसरातील शाळा सुधार, पुण्यासारख्या शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे गावात सेवा शिबिराचे आयोजन, शेतकरी बांधव उत्पन्न वाढीसाठी गावात तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण, डीजे बंदी, वाचन व व्यायाम संस्कृती विकास, गावातील इतर मंदिरांच्या जिर्णोद्धार, पर्यटनातून उत्पन्न वाढ असे विषय हातात घेण्यात आले आहेत.
प्रत्येक विषयाकरता तरुण, जेष्ठ व महिलावर्ग यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले. प्रत्येक काम ग्रामस्थांनी सेवा समजून करण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे.
सर्व स्पर्शी या विषयांवर ग्रामस्थ अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने एकत्र येतात, चर्चा करतात. एखादी गोष्ट करायची ठरल्यावर काटेकोर पद्धतीने त्यांची अंमलबजावणी होते. या पद्धतीने उपक्रम मार्गस्थ होत आहेत. विकासाचे "पाडळी पॅटर्न" तयार करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!