सोनवणेंच्या कार्यपद्धती विरोधात
बोंबाबोंब आंदोलन करणार
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यात माणदेशी युवक आक्रमकपणे लक्ष वेधणार
सातारा : म्हसवड (ता. माण) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या बेकायदेशीर, मनमानी आणि एकतर्फी कारभारामुळे लोक भयभीत आहेत. या परिस्थितीसंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही सोनवणे यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे माणदेशी जनतेच्या न्याय हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यात बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती महेश करचे, डाँ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर या माणदेशी युवकांनी पत्रकार परिषदेत दिली.
माण, खटाव तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे काम करीत आहेत. त्यामुळे सेवा नियम डावलून त्यांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. हे अधिकारी, कर्मचारीच निवडणूक प्रक्रियेत असल्याने पारदर्शी निवडणुका होत नाहीत. म्हणून आम्ही माण, खटाव तालुक्यातील मुदत पुर्ण झालेले अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेतून हटवा, अशी मागणी केली आहे. मात्र शासन यंत्रणेकडून कोणतेही सहकार्य होत नाही.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन कामकाज करत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. पत्रकार तुषार खरात यांच्यावर दाखल करण्याता आलेल्या खोट्या गुन्ह्यांचा अभ्यास केला तर अक्षय सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी आरोपी व्हायला पाहिजे होते. तुषार खरात यांना संबंधित प्रकरणात जामीन देत असताना न्यायालयाने षढयंत्राचा बुरखा फाडलेला आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी सोनवणे यांना पाठीशी घालत आहेत. तुषार खरात यांनी दिलेली लेखी निवेदने पाहता संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने उचलबांगडी करून त्यांची खातेनिहाय चौकशी व्हायला पाहिजे होती. परंतु उलट सोनवणेंसारख्या अधिकाऱ्यांना बळ दिले जात आहे. त्यामुळे माण तालुक्यातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे.
अक्षय सोनवणे हे मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोयीच्यादृष्टीने पोलिस ठाण्याचे कामकाज करत आहेत. गोरे यांच्या विरोधात कोणी राजकीय काम करत असेल तर त्याला ॲट्रॉसिटी, पोक्सो, विनयभंग अशा प्रकरणात अडकविण्याचे कारस्थान त्यांनी केले आहे. गोरे- सोनावणे यांचे सख्य एवढे आहे की गोरे यांनी सोनावणे यांचा वाढदिवस म्हसवड पोलिस ठाण्यात जाऊन साजरा केला. हा भक्कम पुरावा असतानाही निवडणुकीसाठी सोनवणे हे योग्य असल्याची भुमिका वरिष्ठ पोलिस अधिकारी घेत आहेत, हे धक्कादायक आहे.
नुकत्याच झालेल्या म्हसवड नगरपालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी विरोध गटाला मारहाण केली. त्याप्रकरणात सोनावणे यांनी विरोधी गटाची मुले उचलून पोलिस ठाण्यात नेली आणि भाजप कार्यकर्त्यांना मोकळे रान केले. ही परिस्थिती समोर असताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यापेक्षा वेगळे काही घडणे शक्य नाही. त्यामुळे सोनावणे यांच्या कार्यकारी पदावरील कामकाजास तीव्र आक्षेप नोंदवून आम्ही पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली, मात्र आमची निराशा झाली. त्यामुळे आता माण तालुक्यातील पोलिसी अत्याचारांचा विषय मुख्यमंत्र्यांपुढे नेण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नाही. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितला आहे. त्यांनी तो न दिल्यास आम्हाला बोंबाबोंब आंदोलन करावेच लागेल, असे करचे, ओंबासे व वीरकर यांनी सांगितले.
आमची बोंब लोकशाहीच्या रक्षणासाठी
साताऱ्यात सध्या संस्कृती, साहित्याचा उत्सव सुरू आहे. त्याचा आम्हाला आनंदच आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे आम्ही स्वागतच करतो. साहित्यात लोकांच्या जगण्याचा हुंकार असतो आणि माण तालुक्यातील लोकांचा आवाज पोहचविण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे. सोनवणेंसाऱख्या पोलिसांचा नंगानाच थांबला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. जिल्ह्यातील इतर तीन मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. जिल्हा प्रशासनाला सत्य परिस्थिती मान्य करायची नाही, हे सांगण्यासाठी आमचे बोंबाबोंब आंदोलन आहे, असे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
माझा तुषार खरात कधी होणार आहे?
मंत्री गोरे यांनी काही दिवसांपुर्वी मला फोनवरून धमकी दिली होती. तुझा तुषार खरात करेन, असे ते म्हणाले होते. यासंदर्भात फिर्याद द्यायला गेलो असता अक्षय सोनवणे हे मंत्री गोरे यांची भीती दाखवत होते. यासंदर्भाने मी दिलेल्या तक्रारीचा सोनवणे यांनी काही तपास केला नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मी उतरणार आहे. त्यावेळी सोनवणे आणि माझा सामना ठरलेला आहे. गोरे आणि सोनवणे हे दोघे माझा तुषार खरात कधी करतात, याची वाट बघत बसण्यापेक्षा मी लढणे पसंत केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!