मुंबईतील राजभवनाची
40 एकर जागा
शिवस्मारकासाठी उपलब्ध व्हावी
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची शासनाकडे मागणी
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिक दृष्ट्या योग्य नाही. मुंबईतील राजभवनाची 48 एकर जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठे आहेत का? त्यामुळे गव्हर्नरच्या जागेपैकी 40 एकर जागा ही स्मारकासाठी उपलब्ध करून शिवरायांच्या पराक्रमाला साजेसे असे शिवस्मारक शासनाने उभे केले पाहिजे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करून उदयनराजे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी अशोक गायकवाड, संदीप शिंदे, अण्णा वायदंडे आदींची उपस्थिती होती.
उदयनराजे भोसले म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे निर्मिती करत असताना कोणतेही समाजावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून फार मोठे देण आहे. संविधान हे कोणीच बदलू शकत नाही. ज्या दिवशी संविधान बदलले गेले, तर देशाच्या अखंडतेला फार मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होईल. काँग्रेसने अनेक वर्ष राज्यासह देशावर राज्य केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पक्षाची वाटचाल सुरू केली. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांकडेही सरकार असताना त्यांनीच शिवस्मारकाचा प्रश्न खरे तर मार्गी लावायला पाहिजे होता. पण तसं झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अरबी समुद्रातील निवडलेली जागा ही निसर्गाच्या दृष्टीने योग्य नाही. मुंबईसारख्या ठिकाणी राज्यपालांच्या नावावर 48 एकर जमीन उपलब्ध आहे. या जागेवरच शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक झाले, तर ते योग्य ठरेल. स्मारकासाठी यातील 40 एकर जागा आरक्षित करण्यात यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे समाजात एकी टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आदर्श घेऊनच त्यांनी घटना लिहिली आहे. बहुजन समाजातील लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे. आज देश महाशक्ती व प्रगतीकडे वाटचाल करत आहे. जातीवाद निर्माण होईल असे कोणी कृती करू नये, नाहीतर देशाचे तुकडे होण्यास फार वेळ लागणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आदर्श घेऊन आपण आपल्या विचारात व्यापकता आणत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती शक्य नाही. महिला, लहान मुले, उपेक्षित समाज यांचा संपूर्ण विचार करून बाबासाहेबांनी अतिशय बारकाव्याने घटना लिहिली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील राजवाड्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झाले याचा मला विशेष अभिमान आहे. लोकांनी कितीही डांगोरा पिठला तरी संविधानाला धोका निर्माण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यातील ज्या घरामध्ये राहत होते. ते घर लवकरच शासनाच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आठवणी जपण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार आहे. साताऱ्यातील राजवाड्याचेही संगोपन व्हावे, यासाठी हेरिटेज ऑर्किऑलॉजिकल विभागाशी सातत्याने संपर्क पत्रव्यवहार सुरू आहे. अशा वास्तु पुन्हा बांधून होणार नाहीत, यासाठी शासनाने पाऊले उचलावीत.
समाज घडविण्यासाठी महात्मा फुले, लहुजी वस्ताद यांचे योगदान मोठे आहे. परंतु छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. त्यांचाच आदर्श घेऊन महात्मा फुलेंनी देखील स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली, हे लक्षात घ्यायला हवे. महात्मा फुले यांनी जी संपत्ती कमावली ती लोकांसाठी खर्च केली. त्यामुळे त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही.
निळा शर्ट... खास बात
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निळा शर्ट परिधान केला होता. याबाबत विचारले असता त्यांनी खास बात सांगितली. इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात. त्यातला निळा रंग मला नेहमीच आवडतो. मनुष्य एकमेव धर्म आहे. जात-पात करणाऱ्यांना मनुष्यधर्म कसा लक्षात येईल? एखादा व्यक्तीचा अपघात झाला किंवा आजारी पडला आणि त्याला रक्ताची गरज पडली तर जात पाहून आपण रक्त घेतो का? त्यामुळे जातिवाद थांबला नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे उदयनराजेंनी सांगितले.
छत्रपती ताराराणींच्या समाधीसाठी केंद्रातून निधी आणणार
संगम माहुली येथील महाराणी ताराराणीसाहेब यांच्या समाधीची दुरावस्था झाली आहे, याबाबत विचारले असता या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लवकरच मीटिंग लावली जाईल. या समाधीच्या कामासाठी जो काही निधी लागेल तो केंद्रातून प्राप्त करून घेऊ, असेही उदयनराजे म्हणाले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!