युवकांनी संविधानाचा अभ्यास
करून देशात बंधुता निर्माण
करावी : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे
हडपसर येथील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये युवक-युवती उन्नयीकरण कार्यशाळा संपन्न
पुणे : देशातील सर्व माणसात आपुलकी निर्माण करण्यासाठीची जबाबदारी आपली आहे. एकमेकांच्या धर्म भावनेच्या उन्मादात अविचारी, अविवेकी वर्तन करणे योग्य होणार नाही. उलट युवकांनी संविधानाचा अभ्यास करून जबाबदार नागरिक बनून देशात बंधुता निर्माण करावी, असे आवाहन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व एस. एम. जोशी कॉलेज हडपसर यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीनदिवशीय युवक-युवती उन्नयनीकरण कार्यशाळेत युवक-युवती उन्नयीकरण व भारतीय संविधान या विषयावर प्रा. डॉ. सुभाष वाघमारे बोलत होते.
या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी प्रा.डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ.निशा गोसावी, डॉ. किशोर काकडे, प्रा.संजय जडे, डॉ. संजय जगताप, डॉ. अतुल चवरे, डॉ.नम्रता कदम यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना योजनेचे संचालक प्रा.डॉ. सदानंद भोसले यांचे मार्गदर्शनाने तीनदिवसीय युवक युवती उन्नयीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, २६ जानेवारी १९५० ला लागू झालेल्या संविधानाने देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्याची अपेक्षा केली. संविधानाचा विचार शिक्षणातून देशात रुजू लागला, त्याला ७५ वर्षे आता होत आहेत. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव न करता समानता स्थापन करण्याचे काम चालू असताना आज इतिहासातील घटना, युद्धे, अस्मिताचा आधार घेऊन वर्तमान भारतीय पर्यावरण प्रदूषित करण्याचे काम काही शक्ती करीत आहेत. त्यामुळे देशात धार्मिक व जातीय विषमता तयार होऊन कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता ही धोक्यात येईल. भारतातील लोक जर आपसात भांडत राहिले, तर देशाची प्रगती होणार नाही. उलट मोठे नुकसान होणार आहे. अशा वेळी देशातील युवकांनी धर्मांध शक्तीचे बळी न होता कामा नये. हिंसक गोष्टीत सहभागी होता कामा नये.
युवकांना वास्तव समजावून देत वाघमारे म्हणाले, "देशातील युवक व युवती यांची उन्नती व्हायची असेल तर विचारपूर्वक घेतलेले प्रगतीचे शिक्षण अभिप्रेत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन करावे लागेल. उद्योग व्यवसाय करावयाचे शिक्षण देणारे प्रशिक्षण घ्यावे लागेल. भारताची वाढत्या लोकसंख्येमुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. तिची कारणे शोधावी लागतील. तर्क विसंगत विचार न करता विवेकी विचार स्वीकारणे आवश्यक ठरेल. प्रगतीचा ध्यास घ्यायला हवा. देशाचे ध्येय काय आहे याचे ज्ञान करून घेऊन जबाबदारीने लोक वागले नाहीत आपलेच नुकसान होईल. देशातील सर्व माणसांच्या समस्याचे संशोधन व्हावे, नैसर्गिक आपत्ती व मानवी व्यवस्थेने निर्माण झालेल्या समस्या यातून सर्वांच्या सुखाचा मार्ग काढून देश जोडला पाहिजे. स्त्रियांवर अत्याचार झाल्याची प्रकरणे वाढतच आहेत. नोकरीत पुरेसे पैसे मिळत नाहीत अगर उदरनिर्वाह व्यवस्थित होत नसल्याने निराश आणि विफलता घेऊन फिरणारे तरुण वेळप्रसंगी शिक्षण सोडून देत, पोटासाठी नोकरीच्या शोधात आहेत. देशात रोज कितीतरी चुकीच्या गोष्टी घडत असतात, योग्य काय अयोग्य काय याचा विचार युवकांनी करायला शिकले पाहिजे. सोशल मिडीयाचा दुरुपयोग होत असून युवकांची क्रयशक्ती अशाने कमी होणार आहे. आळसात राहणे आणि गप्पा मारणे आणि फुकटात खाणे हीच प्रवृत्ती राहिली तर देशातील उत्पन्न वाढणार नाही. परिणामी अनेक वाईट गोष्टी होणार आहेत. निर्व्यसनी राहणे, शरीर आणि मन आरोग्यदायी ठेवणे, कुटुंब चांगले ठेवणे, देश चांगला ठेवणे, स्वतःची कल्पकता आणि ज्ञानवृद्धी करून आपल्या ज्ञानाने स्वतःचा व देशाचा विकास करणे, व्यवसायिक कौशल्य क्षमतांचा विकास जाणीवेने करणे, तरुणाईला प्रशिक्षण देत जाणे, त्यांचे नैतिक उन्नयन करणे, त्यांना संविधानवादी बनवणे आवश्यक झाले आहे. लोकसंख्या नियंत्रण, योग्य आर्थिक व्यवस्थापन, देशात एकोपा राहील असे वातावरण ही कोणाची जबाबदारी? विषमतेमुळे व मानवी प्रदुषणामुळे, मानसिक ताण, नैराश्य आजारपण मागे लागले आहे. त्यामुळे विकसित भारतापासून अजून कोसो दूर आपण आहोत. देशातल्या सर्वांच्या कल्याणाची कळकळ असलेले, भ्रष्ट नसलेले, भारतीयांना कर्तृत्ववान बनवण्यासाठी वाहून घेतलेले, धर्मनिरपेक्षवादी, विधायक नेतृत्व युवाशक्तीमधूनच तयार करायला हवे. धर्मांधता नाकारून भारतातील सर्व नागरिकांनी आपली आचारसंहिता संविधानवादी ठेवली तरच देशाचे भले होईल,"असेही ते म्हणाले.
या संवादसत्राचे प्रास्ताविक प्रा.डॉ.दिनकर मुरकुटे यांनी केले, तर ऋषिकेश खोडदे यांनी आभार मानले. डॉ. नम्रता कदम यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!