अपघातग्रस्त नीलमच्या भेटीसाठी
व्याकूळलेल्या वडिलांच्या
व्हिसाकरिता सरसावले
आ. डॉ. अतुलबाबा भोसले
अमेरिकन दुतावासाकडून शुक्रवारची अपाईंटमेंट
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे व्हिसा मिळण्याचा मार्ग सुकर
कराड : अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या उंब्रज (वडगाव) येथील नीलम शिंदे या युवतीचा १२ दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असून, तिला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या तिच्या वडिलांना मात्र गेल्या १० दिवसांपासून व्हिसा मिळविण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता.
याबाबतची माहिती मिळताच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेमुळे या अपघातग्रस्त मुलीच्या वडिलांना व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अमेरिकन दुतावासाने मुंबईत शुक्रवारी (ता. २८) व्हिसासाठी त्यांची अपाईंटमेंट निश्चित केली आहे.
उंब्रज (वडगाव) येथील ३५ वर्षीय नीलम शिंदे गेल्या ४ वर्षांपासून अमेरिकेत एमएसच्या शिक्षणासाठी स्थायिक आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगला जात असताना तिला पाठिमागून एका कारने जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात तिच्या डोक्याला व दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तसेच छातीलाही मार लागल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर २ दिवसांनी उंब्रज (वडगाव) येथे राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाली. नीलमला ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, त्या रुग्णालय प्रशासनाने व ती शिकत असलेल्या विद्यापीठाने नीलमच्या कुटुंबियांना मेलद्वारे संपर्क साधून, तिच्या उपचारादरम्यान उपस्थित राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिचे वडिल तानाजी शिंदे व तिचे मामा संजय कदम यांचा मुलगा गौरव कदम याने अमेरिकेत जाण्यासाठी तातडीने व्हिसा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळविण्यासाठी गेले १० दिवस त्यांनी अनेक स्तरांवर पाठपुरावा केला. पण व्हिसासाठी अपाईंटमेंट मिळत नसल्याने, नीलमचे वडिल अधिकच व्याकुळ झाले होते.
याबाबतची माहिती कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना मिळताच त्यांनी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत संपूर्ण परिस्थिती विशद केली. मुख्यमंत्र्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, याबाबत संबंधितांना तातडीने सूचना देत अमेरिकन दुतावास कार्यालयाशी संपर्क साधला. तिथून तातडीने चक्रे फिरली आणि अमेरिकन दुतावासाने मेलद्वारे नीलमच्या कटुंबियांना व्हिसासाठी शुक्रवार (ता. २८) रोजीची अपाईंटमेंट दिली. त्यामुळे नीलमचे वडिल तानाजी शिंदे व तिच्या मामांचा मुलगा गौरव कदम यांचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग सुकर बनला आहे.
दरम्यान, नीलमचे वडील, मामा व त्यांचा मुलगा उंब्रज येथून गुरुवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले. मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळावा, यासाठी गेल्या १० दिवसांपासून आम्ही प्रयत्न करत आहोत. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी वरिष्ठ पातळीवर याबाबत संपर्क साधला. आ. डॉ. अतुलबाबांनी थेट मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल कल्पना दिल्याने, ही प्रक्रिया गतीने होऊन आम्हाला व्हिसासाठी अपाईंटमेंट मिळणे शक्य झाल्याचे, मुलीचे मामा संजय कदम यांनी सांगितले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!