शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी कर्मवीरांचे योगदान अद्वितीय : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ संपन्न
सातारा : "आपल्या पूर्वजांना माहीत होते! शिक्षणाशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही. म्हणून त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. आज त्याचीच फळे आपण चाखत आहोत. त्यांनी जो वारसा तयार केला, तो येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक योगानातून हेच सिद्ध होत आहे. आज हे विद्यापीठ म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीला वाहिलेली आदरांजली आहे. बहुजन समाजाच्या शिक्षण, सामाजिक उत्थानासाठी शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान अद्वितीय आहे. आपल्या पूर्वजांच्या योगदानाबद्दल आपण कृतज्ञता असायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
राधाकृष्णन सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रथम दीक्षांत समारंभ कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते. या समारंभास राज्यपालांचे प्रधान सचिव प्रशांत नारनवरे, कुलाधिकारी चंद्रकात दळवी, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, जिल्हाधिकारी विकास देशमुख, डॉ. माणिकराव साळुंखे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार, डॉ. हेमंत उमाप, रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जे. के. जाधव बापू, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेंनकुदळे, विद्यापीठ अधिष्ठाता प्रा. डॉ. डी. नामदास, डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. महांनवर, प्रा. डॉ. आर. आर. साळुंखे, प्रा. डॉ. सचिन वर्णेकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, प्राचार्य डॉ. गणेश जाधव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा व परिसराबद्दल बोलताना राधाकृष्णन म्हणाले, "सातारा हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिसरी राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जर या भूमीत झाला नसता, तर काय झाले असते? मी सुद्धा, आज मी इथे सी. राधाकृष्णन नावाने उभा आहे, पण माझेसुद्धा नाव अजून काही तरी राहिले असते. या भारतभूमीत अनेक पाकिस्तान तयार झाले असते. आक्रमकांच्या विरोधात हे शूर योद्धे लढले. इतिहासात डोकावत असताना आपल्याला या ऐतिहासिक सत्याचे आकलन व्हायला हवे. आपण इस्लामच्या विरोधात आहोत का? तर नाही! इस्लाम सर्वत्र आहे.
आपल्याला एकत्र मिळून राहायचे आहे. परंतु त्याच वेळी आपल्याला ऐतिहासिक सत्याची जाण असली पाहिजे. आपला प्रवास कसा झाला हे आपल्याला कळले पाहिजे आणि हळूहळू आपण आपल्या प्राचीन वैभवापर्यंत पोचत आहोत. सातारा ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी अनेकांची भूमी आहे. १९५२ ला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत मेडल मिळवणाऱ्या खाशाबा जाधव यांची ही भूमी आहे. या प्रदीर्घ काळानंतर आता आपल्याला मेडल मिळत आहेत. १९५२ मिळविलेले मेडल हे या प्रदेशाचे राष्ट्राला मोठे योगदान आहे. ४ महिन्यापूर्वी मी साताऱ्यात लोकहिताच्या कामासाठी आढावा बैठकीस उपस्थित होतो. त्यामुळे मला साताराविषयी भरपूर माहिती मिळाल्यामुळे माझ्या भावना कृतज्ञतेच्या आहेत. आपण जेव्हा सामान्य माणसाला भेटतो तेव्हा त्यांच्याकडून समाज विकासाच्या रचनात्मक, सकारात्मक अनेक कल्पना मिळतात.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाबद्दल बोलताना राधाकृष्णन म्हणाले, २०२१ साली स्थापन झालेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे एक तरुण विद्यापीठ आहे. मागील चार वर्षात विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. मी येत असताना पाहिले.या विद्यापीठाचा परिसर खूप सुंदर, स्वच्छ दिसला. त्याबद्दल मी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांशिवाय हे शक्य नाही. आपण मोठ्या संख्येने तुम्ही सहभाग घेतात, अन्यथा हे कदापि शक्य नाही. हा परिसर आपण असाच स्वच्छ ठेवा, तुम्ही लक्षात घ्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून आपला देश स्वच्छ आणि सुंदर करू पाहत आहेत. प्रत्येकजण म्हणतो, की सिंगापूर हा जगातील सर्वात सुंदर व स्वच्छ देश आहे, पण भविष्यात भारतभूमी स्वच्छ, सुंदर व हिरवागार करण्यासाठी आपणास आवाहन करतो. आपल्या विद्यापीठाच्या तीन नामांकित घटक महाविद्यालयातून ७००० विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. ज्ञान आणि गुणवत्ता विकास होण्यासाठी, शिक्षक, प्रशासक यांच्या सामूहिक प्रयत्न करीत आहेत. एक देश म्हणून आजवर आपण जी प्रगती केली आहे. त्यामध्ये संतुष्ट न राहता त्याही पुढे विकसित भारत निर्माणसाठी आपल्याला अधिकाधिक ज्ञान व गुणवत्ता सिद्ध करावी लागेल.
आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू मला म्हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्यात हे विद्यापीठ अग्रणी आहे. जुन्या शिक्षण धोरणात, अभ्यासक्रमात मग काय उणीवा होत्या? प्रत्यक्ष कशाची गरज आहे त्याचा आणि आपल्या शिक्षणाचा काही सबंध नव्हता. शिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष व्यवहाराचे प्रशिक्षण विद्यार्थ्याला घ्यावे लागत असे, पण मोदीजींनी ठरवले की सिद्धांत आणि व्यवहार ज्ञानाचा अंतर्भाव शिक्षणात असावा. मार्केटला काय हवे आहे ते महाविद्यालयातून शिकविले जावे. हाच नवीन शैक्षणिक धोरणाचा केंद्रबिंदू आहे. कॉलेजमध्ये शिकतो ते व्यवहारात उपयोगी पडावे.
विद्यार्थ्यांशी संवाद करताना त्यांनी मौलिक विचार व्यक्त केले. राधाकृष्णन म्हणाले, ”कर्मवीर भाऊराव पाटलांचा शैक्षणिक वारसा हा सामाजिक न्याय, समता व शिक्षणाचा आहे. आपण नेहमी सामाजिक न्याय व समतेची भाषा बोलतो, पण छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध भारतातील एकमेव राजे आहेत, की ज्यांनी व्यवहारात सामाजिक न्याय व समतेचे राज्य केले. आपण एखाद्यास त्याच्या जन्मजात जातीमुळे वेगळी वागणूक देऊ शकत नाही. एखाद्या अस्पृश्य जातीत जन्मला म्हणून त्याला अस्पृश्य म्हणून वागवू शकत नाही. जर आपण त्या समुदायात जन्मलो आणि तशी वागणूक मिळाली, तर आपण ती स्वीकारू का? नाही. कदापि नाही, कुणी श्रेष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही. माझ्या तरुण मित्रांनो! जन्माने माणूस कधीही महान नसतो, प्रत्येकजण आपल्या चारित्र्याने महान होत असतो. तुम्ही हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे आणि हा आजचा दिवस जो तुमच्या जीवनात अविस्मरणीय आहे.
आजच्या दिनी मी तुम्हाला सांगतो, की प्रथम तुम्ही आज्ञाधारक व्हा. कॉलेजमधील जीवन आणि कॉलेज बाहेरचे जीवन यात मोठे अंतर आहे. तुम्हाला सामाजिक जीवन शिकणे आवश्यक आहे, जे फार कठीण आहे. इथे तुम्हाला तुमचे पालक पैसे पाठवतात. मित्रांच्या सोबत तुम्ही आनंद घेत आहात. परंतु इथून पुढे तुम्हाला मुलांसाठी, पालकांसाठी अर्थार्जन करणे अवघड आहे. म्हणून तुम्हाला माझे आवाहन आहे, की तुम्ही प्रथम आज्ञाधारक व्हा. पण जर तुम्ही आज्ञेत राहिला नाही, तर नेतृत्व करू शकणार नाही. ही छोटीशी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर यश तुमचेच आहे. यश आपोआप मिळणार नाही, समर्पण, कष्ट व निष्ठेशिवाय यश मिळणार नाही. तुम्ही कामात कसे सहभागी होता, त्यावर तुमचे भविष्यातील यश अवलंबून आहे. पण, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, की जीवनाचा प्रवास सुरूच राहील. तुम्ही काळजी करा अथवा न करा, तुमच्या आयुष्यात ध्येय असो वा नसो. सूर्य उगवेल, मावळेल दिवसामागून दिवस निघून जातील. चंद्र उगवेल मावळेल, जर का तुम्हाला जीवनात काही मिळवायचे असेल, यश मिळवायचे असेल तर तुमच्यापुढे ध्येय असले पाहिजे. तुम्ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे; परंतु कधीही दुसऱ्याच्या वेगाशी तुम्ही तुलना करू नका. आपल्या एका विद्यार्थ्याने बॉक्सिंगमध्ये सिल्व्हर मेडल मिळविले. त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपण तशी फायटिंग करू शकणार नाही, तसे प्रशिक्षण नाही. आपण त्याचा सराव करत नाही आणि सहभाग घेत नाही. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित करून ध्येय प्राप्तीसाठी आपल्या गतीने वाटचाल केली पाहिजे. ईश्वराने सर्वांना आपल्यालासारख्या गतीने तयार केले नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात निराशा येते. शिकागो धर्म परिषदेस जाण्याअगोदर एक महिना स्वामी विवेकानंदांच्या जीवनात देखील नैराश्य आले होते. पण तिथे कोणी ओळखीचे नव्हते. परंतु धर्म परिषदेनंतर त्यांनी नैराश्यावर मात केली. परंतु आज हिंदूच नाही प्रत्येक धर्मीय त्यांची आज आठवण काढतात हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही तुमच्या गतीने चालत राहा. थोडासा विसावा घ्या, पुन्हा तुमच्या गतीने पुढे जा. अधिकाधिक कष्ट आणि सहभाग घेऊन वाटचाल करत राहा. यश तुमचेच असेल. या निमिताने मी आपल्या सर्वाना शुभेच्छा देतो. तुम्ही आनंदी आरोग्यदायी रहा. आनंदाचा कधीही त्याग करू नका. आनंदाचा त्याग केला की नैराश्य येते. आपण आनंदी व यशस्वी व्हावेत यासाठी माझ्या शुभेच्छा..!
कुलाधिकारी चंद्रकात दळवी यांनी रयत या शब्दाच्या निर्मिती ते रयत शिक्षण संस्थेची स्थापना यांची माहिती दिली. महाराष्ट्रात मेकॉले या शिक्षण तज्ञाच्या प्रभावाने शहरात सुरवातीस शिक्षण संस्था सुरू झाल्या, पण ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखून रयत शिक्षण संस्थेने बहुजन समाजाच्या जीवनात शिक्षणाने आमूलाग्र क्रांती केली. ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न कर्मवीरांनी पाहिले होते, ते पूर्ण करण्याचा ध्यास रयत शिक्षण संस्थेचा होता आणि ती इच्छा पूर्ण झाली. २७ ऑक्टोबर २०२१ ला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची स्थापना झाली. कर्मवीरांच्या स्वप्नातले विद्यापीठ साकार करण्यासाठी रयतच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या तिन्ही महाविद्यालयांनी संशोधन, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विस्तार कार्य आदी सर्व क्षेत्रात उच्च व उत्तम गुणवत्ता संपादन करून विद्यापीठ निर्मिती होण्यासाठीची पायाभरणीच केली.
विद्यार्थ्यांना उपदेश करताना त्यांनी नवनिर्मितीने नवीन समाज घडत असतो. विविध विषयांचे ज्ञान घेऊन व्यापक व्हा, मोठी ध्येये ठेवा, उंच व्हा. यश अपयश जीवनात येतच असते. त्यातूनच नवी आव्हाने घेण्याची उभारी मिळत जाते. पण क्षमता आत्मसात करून घेण्याचा ध्यास सतत हवा. संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम, माजी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन, प्रतिभावान विद्यार्थी ही आपली बलस्थाने आहेत. "अत्त दीप भव" हे बोधवाक्य स्वयंप्रकाशित व्हा सांगते. ज्ञानाचा उपयोग राष्ट्र विकासासाठी देखील झाला पाहिजे. विद्यापीठात आवश्यक सुविधा देणे, आधुनिक शिक्षण व प्रशिक्षण देणे, स्वयं रोजगार करण्यासाठीचे पर्यावरण उपलब्ध करून देणे हेही जबाबदारी आम्ही घेऊन जाणीवेने व सतर्क होऊन संघटितरित्या काम करीत आहोत. जगात आपली विद्यार्थी कर्तृत्वान होतील, असे ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी अहवाल वाचन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न पहिले होते ते राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. २०२१ पासूनच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी , विविध अध्यासन निर्मिती, पीएच.डीसाठी ६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश, बी.बी.ए व कौशल्याधीष्टीत कार्यक्रम, ३३ पेटंटची प्राप्ती, २० पेटंट प्रसिद्धी, २८ पेटंट स्वामित्व हक्क, सांस्कृतिक कार्यक्रमात धनिष्ठा काटकरचे यश, परिसर स्वच्छता, राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यात प्रभावी सहभाग, भाषा मंडळाचा बोलीभाषेतील लघु संशोधन प्रकल्प, अर्जुन देवतळे यांनी मिळविलेला अर्जुन पुरस्कार, आर्या बारटक्के हिचे बॉक्सिंग स्पर्धेतील यश, कम्युनिटी रेडीओची निर्मिती इत्यादी ठळक बाबींची माहिती त्यांनी दिली. ‘अत्त दीप भव" म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा’ हे विद्यापीठाचे बोधवाक्य असल्याचे सांगून वेगवान जगात आधुनिक कौशल्ये आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे आणि आत्मविश्वास व सर्जनशीलता या आधारे जागतिक पातळीवर विद्यार्थी अस्तित्व उज्ज्वल करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आल्यानंतर प्रथम स्वागत करण्यात आले. विविध अधिकार मंडळचे राज्यपाल यांच्या सोबत फोटो घेण्यात आले. प्रारंभी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने समारंभाची सुरुवात झाली. कुलाधिकारी चंद्रकात दळवी यांनी राज्यपाल यांना गुलाब फुलांचा गुच्छ, शाल व विद्यापीठाचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाचे प्रधान सचिव यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कुलसचिव डॉ. विजय कुंभार यांनी समारंभ सुरू करण्याविषयी कुलपती यांना विनंती केली.
कुलपती डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या अनुमतीने प्रथम दीक्षांत समारंभास सुरुवात झाली. या समारंभात स्टेजवर ३४ सर्वोकृष्ट गुण मिळविलेल्या विविध विद्याशाखा व विषयाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी मराठीत, तर प्रा. राजेंद्र तांबिले यांनी इंग्रजीत केले. या समारंभास विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, पत्रकार व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!