कर्मवीर विद्यापीठाचा उद्या राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते राजधानी साताऱ्यात होणार दीक्षांत समारंभ
६७९ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी, कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांची माहिती
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्यपाल व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी कॉलेज येथे होणार आहे. यावेळी ६७९ विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाणार आहे , अशी माहिती विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रकांत दळवी म्हणाले, प्रथम दीक्षांत समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. चंद्रकांत पाटील, विविध खात्यांचे अधिकारी, रयतचे पदाधिकारी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, सेवक उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची २७ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थापना केलेले क्लस्टर विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सातारा या महाविद्यालयाच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय या विद्यापीठाची घटक महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे, उद्योग आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे कर्मवीराच्या विचारांशी सुसंगत अशी उद्दिष्टे विद्यापीठाची आहेत.
शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२, सन २०२२-२३, सन २०२३- २४ अशी तीन वर्षे विद्यापीठाला पूर्ण झाली असल्यामुळेच हा प्रथम दीक्षांत समारंभ होत असल्याचे चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.
प्रत्यक्ष समारंभात कुलपती विद्याशाखानिहाय सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या ३ स्नातकांना पदवी प्रदान करतील. नंतर विषयात सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या इतर ३१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी ६७९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. विजय कुंभार, डॉ. शिवलींग मेनकुदळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. हेमंत उमाप व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!