कॅन्सर जनजागृती प्रशिक्षण शिबिरास आशा सेविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


कॅन्सर जनजागृती

प्रशिक्षण शिबिरास

आशा सेविकांचा प्रतिसाद

साताऱ्यात ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन 

सातारा : सातारा जिल्ह्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आणि मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आशा सेविकांसाठी कॅन्सर जनजागृती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात वरिष्ठ सल्लागार आणि प्रतिबंधात्मक ऑन्कोलॉजी तज्ञ डॉ. अर्जुन शिंदे यांच्या हस्ते झाली. त्यांनी कॅन्सर प्रतिबंधासाठी जनजागृतीचे महत्त्व पटवून दिले आणि आशा सेविका त्यांच्या गावांमध्ये कॅन्सर जनजागृतीमध्ये कशी मोलाची भूमिका बजावू शकतात यावर भर दिला.


मुख्य प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. चैत्रा देशपांडे यांनी केले. त्यांनी स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे, स्वयं स्तन तपासणी तसेच उपचाराच्या पद्धती याबाबत सखोल माहिती दिली. 

या कार्यक्रमात जिल्हा परिषद साताराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तसेच कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव आणि डॉ. भगवान मोहिते यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.


ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष उदय देशमुख यांनी आशा सेविकांना लवकरच कॅन्सर स्क्रीनिंगची योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले. तसेच कांचनताई साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून सर्व आशा सेविकांचे मनोबल वाढविले आणि त्याच्यासाठी लागेल ते सहकार्य पुरविण्याची ग्वाही त्यांनी दिली.


प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व आशा सेविकांना प्रशिक्षणात उस्फुर्त सहभाग नोंदविल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दीपाली देसाई यांनी केले. त्यांच्या आभार प्रदर्शनामध्ये त्यांनी सर्व उपस्थितांचे, विशेषत: आशा सेविकांचे, कॅन्सर जनजागृतीसाठी या प्रशिक्षणात सहभागी झाल्याबद्दल आणि पुढील काळात कॅन्सर प्रतिबंधासाठी प्रयत्नशील राहण्याच्या संकल्पाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील आशा सेविकांमध्ये कॅन्सर जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यास प्रेरणा मिळाली आहे. ज्यामुळे गावागावात कॅन्सरची लवकर तपासणी व योग्य उपचाराची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments