'अजिंक्यतारा'च्या कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड


'अजिंक्यतारा'च्या कामगार, 

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड 

आ. शिवेंद्रसिंहराजे; कामगारांना १९ टक्के बोनस जाहीर

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत कामगार- कर्मचाऱ्यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या कामगार- कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्यात येत असून यानिमित्ताने कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

कारखान्याच्या अडचणीच्या काळामध्ये कामगार आणि कर्मचाऱ्यांनी कसलीही अटीतटीची भाषा न करता कारखान्याच्या हिताचा निर्णय घेऊन कामकाज केले. ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांमुळेच आज अजिंक्यतारा कारखाना आर्थिक सक्षम झाला आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये अधिकारी व कर्मचारी- कामगार यांचा मोलाचा वाटा आहे. कामगार आणि व्यवस्थापनाचे नेहमी सौहार्दपुर्ण संबंध राहिलेले आहेत. कारखान्यानेही सातत्याने कामगारांच्या हिताची जपणूक केली आहे. कामगारांना जास्तीत जास्त बोनस देण्याची पंरपरा कारखान्याने यावर्षीही अखंडित ठेवली असून दिपावली सणानिमित्त भरघोस १९% बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कारखाना कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकारी, कामगार- कर्मचारी यांना कारखान्याने दिवाळीसाठी १९ टक्के बोनस देण्याचा निर्णय कामगार युनियशी चर्चा करून घेतला आहे. ही बोनसची रक्कम ३ कोटी ३६ लाख होत असून, ती दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित अधिकारी व कामगार- कर्मचा-यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. सध्या कारखान्यात ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत. कारखाना वेळेवर सुरू करून ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचा-यांच्या सहकार्याने होऊ घातलेला गळीत हंगाम यशस्वी करू, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष यशवंत हरी साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव विष्णू सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, कामगार युनियनचे पदाधिकारी व कारखाना अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments