शिवसेना सोबत असल्याचा आता
विद्यमान आमदार खोटा कळवळा
दाखवतायेत : पुरुषोत्तम जाधव
श्री मांढरदेव, लोहारे, बोपर्डी, पिराचीवाडी येथील संवाद मेळाव्यास नागरिकांचा प्रतिसाद
वाई : आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे कट्टर शिवसैनिक आहोत. संघर्ष आमच्या नसा नसात भिनला आहे. वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आम्हा शिवसैनिकांना टोकाचा विरोध करणारे विद्यमान आमदार आता मात्र शिवसेना आमच्या सोबतच असा खोटा कळवळा आणत आहेत. मात्र बाळासाहेबांच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक विद्यमान आमदाराला आता घरी बसवणारच, असा स्पष्ट इशारा शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे वाई व महाबळेश्वर तालुक्यात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी दिला आहे. मात्र, विद्यमान आमदाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विकासकामाच्या उद्घाटन, भूमिपूजन करताना मुख्यमंत्री यांचे साधे नावदेखील बोर्डावर टाकले जात नाही, यांची खंत आम्हा शिवसैनिकांना आहे. निधी कोणीही आणला तरी श्रेय मात्र आमदारच घेतात.
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा प्रवृत्तींना आपण वेळीच रोखले नाही तर आपण गुलामगिरीत जाऊ, वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात गेली ५० वर्षे होऊन अधिक काळ राजकारणात तीच ती घराणी सत्ता भोगत आहेत. आजही एकाच घरात दहा- दहा पदे भोगणाऱ्या व आपल्यावरच राजकीय कुरघोड्या करणाऱ्या विद्यमान आमदारांची राजकारणातील घराणेशाही संपविण्यासाठीच माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील सामान्य व्यक्ती आता विधानसभेच्या मैदानात उतरला असून, मतदारसंघातील सर्वांचीच मोठी साथ मिळत आहे. आता परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी श्री मांढरदेवी काळुबाई, लोहारे, बोपर्डी, पिराचीवाडी येथील संवाद यात्रेदरम्यान व्यक्त केला.
मांढरदेव पुरुषोत्तम जाधव यांचे आजोळ असल्याने या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मांढरदेवच्या सरपंच रेश्मा मांढरे, गोरख मांढरे, तसेच सर्व बाजारपेठेतील व्यापारी, लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच रविवार पेठ वाई येथे सर्व देवी भक्त, वाई तालुका संघटक युवराज अण्णा कोंढाळकर , बाळासाहेब जाधव लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष, शिवसेना वाई विभागप्रमुख प्रताप भिलारे, भूषण शिंदे, सचिन धायगुडे,भानुदास जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांचा जनसंवाद यात्रेत समावेश
क्षेत्र महाबळेश्वर येथून ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या जनसंवाद यात्रेला महाबळेश्वर शहर, पाचगणी शहर, कांदाटी खोरे, कोयना खोरे, तापोळा, वाई शहर व वाई तालुक्यातील सर्वच घटकातील तसेच सर्व पक्षातील कार्यकर्ते व नागरिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या मनातील विद्यमान आमदारांविरोधाची खदखद गावोगावी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र आता आपली माघार नाही असा पवित्रा पुरुषोत्तम जाधव यांनी घेतलेला दिसत आहे.
१२ ऑक्टोबरपर्यंत संवाद यात्रा खंडाळा तालुक्यात
शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी क्षेत्र महाबळेश्वर येथून सुरू केलेल्या संवाद यात्रेला महाबळेश्वर व वाई तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. संवाद यात्रा खंडाळा तालुक्यात पोहोचली असून ती १२ ऑक्टोबरपर्यंत गावोगावी पोहोचणार आहे. या संवाद यात्रेसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते काम करत आहेत.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!