धोंडेवाडी -धनगरवाडी येथे भूस्खलनाचा मोठा धोका

 


धोंडेवाडी -धनगरवाडी येथे भूस्खलनाचा मोठा धोका 


सातारा: सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायतअंतर्गत धनगरवाडी गावाजवळ भूस्खलनाचा मोठा धोका संभव होत आहे. दोन तीन- दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास हे डोंगरमाथ्यावरील सुमारे पन्नास फूट लांब व चार ते पाच फूट खोल जमीन खचली आहे. शेजारीच ये- जा करण्यासाठी दहा फूट अंतरावर रस्ता आहे.

खचलेल्या जमिनीपासून जवळच लोकवस्ती असून या ठिकाणी सुमारे सव्वाशे लोकवस्ती तर २५ ते ३० घरी आहेत. 

हे भूस्खलन जमीन ढिसाळ झाल्याने पावसाचे पाणी मुरून निसरडी झाली असून, भूस्खलनाचा धोका संभावत आहे. या ठिकाणी १०० मीटर अंतर या भूस्खलनाने व्यापले आहे. दुर्दैवाने ही घटना घडली तर या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या धोंडेवाडी गावालासुद्धा मोठा धोका संभावत आहे. याच लोकवस्तीच्या डोंगरवर मोठ-मोठे दगड असून या वस्तीवर ढासळण्याची भीती येथील नागरिकांनी बोलून दाखवली. हे दगड वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने वनविभागाने ते हटवावेत, अशी मागणी केली जात आहे.

येथील लोकांचा उदरनिर्वाह हा शेती असून पावसाच्या पाण्यावर पिकवली जात असून नाचणी पिक मुख्य आहे. जोडव्यवसाय म्हणून दूधदुभती आहेत. या ठिकाणची बहुतांशी लोक उदरनिर्वासाठी मुंबई-पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्ताने आहेत.

डोंगरमाथ्यावरील याच भागात रेंडीमुरा, शेडगेवाडी येथेही अशीच भूस्खलनाची घटना घडल्या असून सुमारे दीडशे फूट अंतर जमीन सरकली आहे. कुंभारगणी येथेही जमीन भूस्खलन झाले असून पावसाच्या पाण्यामुळे या घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन आपले जीवन कंठत आहेत. मुसळधार पाऊस असल्यामुळे नैसर्गिकरित्या अशा घटना घडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. रस्त्यावरीलही दरडी कोसळलेल्या आहेत. त्यामुळे येथे प्रवास करणाऱ्या रहिवाशांना कोणत्या ना कोणत्या तरी समस्येला दररोज सामोरे जावे लागत आहे.

Post a Comment

0 Comments