दिया कंनवाने आशियाई
साम्बो चॅम्पियनशिपमध्ये
पटकावले कांस्यपदक
भारताचे नाव उंचावले, पाचगणी शहरात काढली मिरवणूक
सातारा : पाचगणी येथील आजोळ असणाऱ्या व राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवती येथे वास्तव्यास असणाऱ्या दिया कंनवा हिने आशियाई साम्बो स्पर्धेत कांस्यपदक पटकावून केवळ पाचगणी, राजस्थान नव्हे तर भारताचे नाव जगात उंचावले आहे. या यशाबद्दल पाचगणीकर रहिवाशांनी तिची कांस्यपदकासह शहरातून मिरवणूक काढली.
दिया हिने पदक मिळवताच पाचगणी- सिद्धार्थनगर येथील रहिवाशांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. दिया आज पाचगणीत आली असता नागरिकांनी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढली. ही मिरवणूक डीजे तालात व उघड्या जीपमधून काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी दियाचे पुष्पहार घालून नागरिकांनी स्वागत केले. छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली बाजारपेठेतून सिद्धार्थनगरकडे गेली.
दिया हिचा जन्म पाचगणीमधीलच सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण पाचगणी या जागतिक दर्जा असलेल्या शैक्षणिक केंद्रावर झाले. त्यानंतर तिने मूळगाव असलेल्या राजस्थानमध्ये पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन ती राजस्थानला गेली. तेथे अकॅडमीमध्ये शिक्षण घेताना साम्बो या खेळाकडे आपले लक्ष केंद्रित केले. या खेळात तिने अनेक स्पर्धा जिंकल्या. तिची भारताच्या संघातून आशियाई साम्बो चॅम्पियनशिप २०२४ साठी निवड झाली. ही स्पर्धा चीनमधील मकाऊ शहरात पार पडली. मकाऊ येथे तिने आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याने तिने पाचगणीचे नाव जागतिक स्तरावर पोचवले आहे. दियाने साम्बो स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपल्या भारत मातेचा सन्मान वाढवला आहे. तिने मकाऊच्या मातीत भारताचा तिरंगा फडकवला आहे.
दियाने आपल्या यशाचे श्रेय तिचे आई, वडील , मामा, मामी, भारतीय साम्बो फेडरेशनचे पदाधिकारी, राजस्थान क्लब व पाचगणीत नागरिकांना दिले आहे. मेहनतीच्या जोरावर तिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभा सिद्ध केली आहे. तिने अनेक स्पर्धांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाचा झेंडा फडकवला आहे. या यशामुळे पाचगणीकर नागरिकांचा आनंदाने उर भरून आला असून, तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!