गेल्या पाच वर्षात आढळले १०४० कर्करोग संशयित रुग्ण

 


गेल्या पाच वर्षात आढळले

१०४० कर्करोग संशयित रुग्ण

कॅन्सर तपासणी शिबिरांतर्गत घेतला कर्करुग्णांचा शोध

साताऱ्याच्या ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचा उपक्रम

सातारा : अतिशय अल्पावधीत रुग्णांचा विश्वास संपादन करून नावारूपाला आलेल्या सातारा येथील आँन्को लाईफ कँन्सर सेंटर दरवर्षी कर्करुग्णांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. आँन्को लाईफ कँन्सर सेंटर आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षात २६५ कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले असून, या शिबिरांतर्गत सुमारे १०४० कर्करोग संशयित सापडले.

सातारा, पुणे आणि कोल्हापूर भागात आयोजित शिबिरांमध्ये २६,५०० नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १०४० कर्करोग संशयित आढळले. ज्यात ३५ ते ६५ या वयोगटातील ६१५ पुरुष, ४२५ महिलांचा समावेश आहे. या कर्करोग तपासणी शिबिरांतर्गत निदान झालेल्या कर्करोगाच्या प्रकारापैकी पुरुषांमध्ये हेड ॲण्ड नेक कॅन्सर तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसून आले. 

या शिबिरांतर्गत मौखिक तपासणी करण्यात आली. ती सकारात्मक आढळल्याने बायोप्सी करण्यात आली. महिलांमध्ये ब्रेस्ट पाल्पेशन करण्यात आले. ही पाल्पेशन चाचणी सकारात्मक आढळल्यास मॅमोग्राफी आणि सोनेग्राफी करण्यात आली. तसेच व्हीआयए चाचणी (व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ एसिटिक ऍसिड तपासणी) करून सकारात्मक निकाल आल्यास पॅप स्मीअर चाचणी करण्यात आली. यामध्ये उपचार केलेल्या रुग्णांपैकी ८९७ रुग्णांना केमोथेरेपी करण्यात आली, तर १६४ रुग्णांवर रेडिएशन थेरेपी केली आहे.

या शिबिरांमुळे प्रथम व द्वितीय श्रेणीच्या रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास मदत होते व त्यांना पूर्णत: बरे वाटते असे आँन्को लाईफ कँन्सर सेंटरचे चेअरमन उदय देशमुख यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments