बंदोबस्तात ईव्हीएम मशीन्स
शासकीय गोदामामध्ये सुरक्षित
वादळी पावसात एका कॅमेरात तांत्रिक अडचण, जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने दखल
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दि.७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या सर्व ईव्हीएम मशीन्स शासकीय गोदामात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन्सच्या सुरक्षिततेसाठी त्रिस्तरीय पोलिस यंत्रणेसोबत ६२ सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी आहेत. यापैकी शनिवार, दि. १० रोजी झालेल्या वादळी पावसानंतर एका कॅमेरात तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्हीतील चलचित्रे किंचित खाली वर होऊन चलचित्र दिसण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. ही बाब समजताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तेथेच नेमणुकीला असलेल्या सीसीटीव्ही तंत्रज्ञाने तातडीने पाच मिनिटात दुरुस्ती करून सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा पूर्ववत केली.
याबाबत माहिती अशी, सातारा लोकसभेसाठी दि. ७ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी १८ लाख ८९ हजार ७४९ पैकी ११ लाख ९१ हजार ८६९ मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन्स पोलिस बंदोबस्तात सातारा येथील शासकीय गोदामात आणण्यात आली. यानंतर ही सर्व ईव्हीएम मशीन्स तीन स्तर असलेल्या सुरक्षा कवचात ठेवण्यात आली असून गोदामात कडेकोट बंदोबस्त आहे. याशिवाय गोदाम व परिसरात तब्बल ६२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा आहे. गोदामाच्या प्रत्येक गेटवर चार कॅमेरे आहेत. तसेच उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिधींना गोदामाच्या सुरक्षेची पाहणी करण्यासाठी तीन टीव्ही संचांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना पाहण्यासाठी कंट्रोल रुममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, दि. १० रोजी सातारा व परिसरात वादळी पाऊस झाला. यामुळे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्हीतील चलचित्रे किंचित खालीवर होऊन चलचित्र दिसण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. तथापि इतर सर्व कॅमेरे सुस्थितीत होते व त्यामधील यंत्रणा चालू होती. एका कॅमेर्यातील अडचणीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्याठिकाणी नेमणुकीवर असलेल्या तंत्रज्ञाला तातडीने आदेश दिल्यानंतर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. केवळ एका कॅमेर्याच्या चलचित्रामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती, तथापि सदर दुरुस्ती करून संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत केलेली आहे.
जालन्यातील कंपनीला कारणे दाखवा नोटीस
हा प्रकार वादळी पावसाने झाला असला तरी जिल्हा प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेतली आहे. संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच मतमोजणी होईपर्यंत याठिकाणी स्वतः समक्ष हजर रहावे, गोदाम सोडून कोठे जायचे असल्यास जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी, थोडा जरी हलगर्जीपणा केल्यास काळ्या यादीत टाकले जाईल व अनामत रक्कम जप्त केली जाईल, असा इशारा या नोटिसीत जालना येथील कंपनीला देण्यात आला आहे.
.jpg)

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!