राजरत्न पुरस्कार म्हणजे छत्रपतींचा साक्षात प्रसादच

 


राजरत्न पुरस्कार म्हणजे

छत्रपतींचा साक्षात प्रसादच

प. पू. आचार्य स्वामी श्री. जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रतिपादन

राजरत्न पुरस्काराने पत्रकार संदीप पवार यांचा गौरव 

सातारा : राजरत्न पुरस्कार हा साधारण पुरस्कार नाही. हिरकणीच्या तोलामोलाचा असा हा पुरस्कार आहे. अतिशय सर्वोच्च पुरस्कार आहे. राज्यातील कोणत्याही पुरस्काराची तुलना या बरोबर होऊ शकत नाही. राजरत्न पुरस्कार म्हणजे छत्रपतींचा साक्षात प्रसादच आहे, असे प्रतिपादन प. पू. आचार्य स्वामी श्री. जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.

श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले ( प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व नागपूरकर भोसले राजा ऑफ देऊर आणि महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी सिनीयर भोसला पॅलेस येथे ते बोलत होते.


या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, श्रीमंत राजे रघुजी भोसले ( पंचम), श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले ( तृतीय), श्रीमंत राजकुमारी मोहिनी राजे भोसले, श्रीमंत राणी सौ. यशोधरा राजे भोसले, प्रतिष्ठानचे मुख्य सचिव ॲड. प्रदिप देशमुख, सचिव राजकुमार शिर्के, ठाकूर किशोरसिंह बैस, श्याम पाठक उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना जगद्गुरू रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले, भाषण हा माझा प्रांत नाही. आम्हाला अभिमान पाहिजे जर का शिवाजी महाराज नसते, तर आज आपण आपल्या धर्मात नसतो. संस्कार आणि संस्कृती या घराण्यामुळेच आहे. भोसले घराणे खूप महान आहे. हा निव्वळ पुरस्कार नाही, तर आशिर्वाद आहे. यातून समाजाने प्रेरणा घ्यावी. मानवी जीवन ही एक संधी मिळाली आहे. नियोजन चुकले तर माणूस दु:खी होतो. हजारो वर्षे ही पुरस्काराची परंपरा सुरू रहावी. देवाने मला हात का दिले याचा जरूर विचार करावा.

 यावेळी पत्रकार संदीप पवार, ओमप्रकाश शिव, ओजस प्रविण देवतळे, सौ. श्रृती जैन, पत्रकार अनंत मुळे, संजय भाकरे, कुमारी देवश्री रोशन नंदवंशी, कुमार राघव साहिल भांगडे यांना २०२४ चे राजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.नागपूर येथील सिनीयर भोसला पॅलेस या राजमहालात झालेल्या समारंभासाठी हजारो नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी एम. ए. कादर, डॉ. उदय बोधनकर, चंद्रशेखर गुप्त, गजानन कावळे, किशन शर्मा, अतुल ढगे, सुखदेव धुर्वे, हाजी सैयद शबीर, श्रीमंत युवराज जयसिंहराजे भोसले, शेखर शाहु, राम खुशलानी, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. मुधोजी राजे भोसले यांनी प्रास्ताविक केले. सारंग ढोक यांनी सुत्रसंचालन केले. सागर खादीवाला यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments