गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळवून देणार

 


गिरणी कामगारांना हक्काची 

घरे मिळवून देणार

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला गिरणी कामगारांना शब्द

सातारा : गिरणी कामगारांमुळेच मुंबईची शान वाढलीय. त्यांच्यामुळेच मुंबईचे महत्व वाढले, पण आज तेच गिरणी कामगार गेली ४० वर्ष हक्काच्या घरासाठी झगडत आहेत. कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आ. सुनील राणे यांच्या सहकार्याने गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर निश्चितच मार्ग काढणार आहोत. सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांना लवकरच हक्काची घरे मिळवून देऊ, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गिरणी कामगारांना दिला. 

सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याला कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आ. सुनील राणे, म्हाडाचे संबंधित अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. सुनील राणे यांच्या माध्यमातून गिरणी कामगारांचे प्रश्न निश्चितच सुटणार आहेत. 

गिरणी कामगार आणि वारस यांची पात्रता निश्चित करण्यासाठी हा मेळावा घेतला आहे. याठिकाणी कागदपत्र तपासणीसह ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधाही आपण उपलब्ध करून दिली आहे. 

या मेळाव्याचा उद्देश फक्त एकच आहे आणि तो म्हणजे गिरणी कामगारांना घरे मिळवून देणे! गिरणी कामगारांच्या इच्छेनुसार नवी मुंबई, वाशी, पुणे, अगदी साताऱ्यातही त्यांना घरे उपलब्ध व्हावीत याबाबत आ. राणे यांच्याशी चर्चा केलीय. गिरणी कामगारांचा घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः या कामगारांच्या सोबत आहे.

Post a Comment

0 Comments