सातारा लोकसभा
मतदारसंघावर
भाजपाच लढणार
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांचा दावा
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा आम्ही लढवू, अशी भूमिका मांडली आहे, ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवेल. भाजपने अशी कोणतीही अधिकृत चर्चा केल्याचे आपल्या कानावर नाही. गेल्या तीन ते चार वर्षापासून भाजपने मोठ्या ताकदीने सातारा जिल्ह्यात कामे करत आला आहे. जिल्ह्यात ही एक नंबरची पार्टी आहे.त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्याही किंमतीवर भाजपकडे राहिला पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत,असा दावा भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.
वाई मतदारसंघापासून सातारा, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर व दक्षिण आणि पाटण मतदारसंघ पाहिला तर भारतीय जनता पार्टीचेच प्राबल्य आहे. त्यामुळे कोण काय भूमिका मांडते, याबाबत वरिष्ठ चर्चा करतील आणि वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील. परंतु, गेल्या चार वर्षांपासून लोकसभेची तयारी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपाच्या उमदेवारास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्याही किंमतीवर भाजपकडे राहिला पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. ही भूमिका पक्षश्रेष्ठींकडेही मांडली आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, त्याची अंमलबजावणी आम्ही कार्यकर्ते करत असतो. परंतु, आमचा आग्रह आहे की, कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभेचा मतदारसंघ भाजप सोडणार नाही.स्थानिक पातळीवर तुमच्यात एकमत नाही, यावर आ. गोरे म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपली भुमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, भूमिका मांडताना सर्वांनीच विचार करून भूमिका मांडली पाहिजे. जागावाटप हे तिन्ही पक्षांच्या समन्वयाने होईल. परंतु, त्यापूर्वीच अशा पद्धतीच्या चर्चा होणे इष्ट नाही.
राष्ट्रवादी जिल्ह्यात प्रबळ होती, परंतु आता प्रबळ नाही. सध्या भाजप सोडल्यास इतर पक्षांना खूप कमी वाव आहे. त्यामुळे सातारा मतदारसंघ भाजप ताकदीने लढेल.
भाजपचा उमेदवार कोण असेल यावर आ. गोरे म्हणाले, भाजप ही अनुशासित पक्ष आहे. पक्षाचा उमेदवार जिल्हापातळीवर ठरत नाही, तर वरिष्ठ पातळीवर ठरतो. पक्ष जो उमदेवार देईल, तो उमेदवार सक्षमपणे लोकसभा लढवेल आणि सातारचा खासदार भाजपचा असेल. तिन्ही पक्षाची महायुती असली तरी सातारा लोकसभेच्या जागेवर पहिला दावा भाजपचा आहे. उमेदवारीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते साताऱ्यात येवून गेले आहेत. त्यांच्याकडे अहवाल गेला आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल.
राष्ट्रवादी बैठकीतील आरोपास प्रत्त्युत्तर देताना आ. गोरे म्हणाले, आ. शशिकांत शिंदे यांनी स्वत:चे बघावे. राष्ट्रवादीच्या बैठकीला व्यासपिठावर अर्धी लोकं तरी होती का? तेथे काँग्रेसचीच दिसत होती.
पदाधिकारी निवडीत सगळ्यांनाच न्याय देणे शक्य नसते. अनेक छोट्या-मोठ्र्या नाराजीचा विषय होतो. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. संघटनेत सर्वांना सामावून घेवून काम केले जाईल, असे आ. गोरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघावरून एकीकडे महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची काल साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात महत्त्वाची बैठक पार पडली होती. तोच आज भाजपचे आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा असल्याचे सांगून राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!