जरंडेश्वर साखर कारखान्यावर
स्वाभिमानी संघटनेचा हल्लाबोल
सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी हे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून संपर्कात होते. कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू असतानाच साताऱ्यामध्ये आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसत होती.
शेतकरी संघटना उसाला यंदाच्या गाळप हंगामामध्ये पहिली उचल साडेतीन हजार रुपये व गेल्या हंगामातील ४०० रुपये द्या, या मागणीसाठी सातत्याने आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच कारखानदार उसाची कोंडी फोडण्यासाठी एकमेकाकडे बोट दाखवत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते वैतागून गेले होते. वारंवार विनंती व निवेदन देऊनसुद्धा कारखानदार याकडे बघायला तयार नव्हते. त्यामुळे आज जरंडेश्वर साखर कारखान्यावर ऊस वाहतूक रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन व कारखाना व्यवस्थापन स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऐकायला तयार नव्हते. आंदोलन होऊ नये म्हणून बैठक निष्फळ झाल्यानंतर स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच जरंडेश्वर साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली.
स्वाभिमानीचे पदाधिकारी हात जोडून वाहनचालकांना विनंती करून एका बाजूला ऊस वाहतुकीची वाहने लावायला सांगत होते. त्या विनंतीला मान देऊन वाहनधारकांनी रस्त्याच्या एका बाजूला वाहने लावली. त्यामुळे वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. परिणामी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तब्बल सात किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या. पोलीस प्रशासनाला विनंती केल्यानंतर व्यवस्थापनातले अधिकारी खाली आले. ३० नोव्हेंबरला पहिल्या हप्त्याच्या रूपाने ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आश्वासन कारखाना व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत पाच तास ऊस वाहतूक रोखल्यामुळे वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी बैल वाहतूक मात्र सुरळीत चालू ठेवली. त्यामुळे उपस्थित लोकांनी संघटनेच्या आंदोलनाचे कौतुक केलं.
जरंडेश्वर साखर कारखान्यावर आंदोलन म्हटलं, की आतापर्यंत पंधरा मिनिटांच्या पुढे होऊ देत नव्हते. मात्र, आज तब्बल पाच तास आंदोलन सुरू राहिले. आंदोलन यशस्वी झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अभिनंदन केले.
जिल्ह्यातील कोंडी फोडताना साखर कारखाना काय दर देतोय हे पाहून आम्ही दर देऊ, अशी भूमिका सगळेच कारखानदार खाजगीत सांगत होते. त्यामुळे संघटनेने साखर कारखान्यावर हल्लाबोल करून दर जाहीर करण्याची मागणी केली. मात्र, व्यवस्थापनातल्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून ३० तारखेच्या आत दर देण्याचा जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रदूषणाचा मुद्दा ही उपस्थित करत स्वाभिमानीला या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याच आवाहन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस बिल दर आंदोलनाचा प्रश्न मिटला की प्रदूषणासंदर्भात आंदोलन उभे करण्याचे आश्वासन राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
या आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव-पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भुजबळ, पक्ष जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, अर्जुन साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुकाध्यक्ष दत्ता घार्गे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव,विजय झांझुर्णे, दिलीप कदम सांगवी, गोपीनाथ निकम, नवनाथ जगदाळे व विविध गावचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!