मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; पत्रकार हैबतराव आडके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार ; कराडला शनिवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा



मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पत्रकार हैबतराव आडके यांना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राज्यस्तरीय आदर्श 

पत्रकार पुरस्कार

कराडला उद्या होणार पुरस्कार वितरण सोहळा 

कराड : प्रतिनिधी 

सामाजिक, पत्रकारिता, साहित्य, कला, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्यावतीने सात मान्यवरांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उद्या शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हॉटेल सत्यजित विट्स, पुणे-बेंगळुरू महामार्ग, वारुंजी फाटा, कराड येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

पुरस्कारार्थींमध्ये डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांना ‘मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार’, प्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार’, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शिरीष बाबुराव जंगम यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’, प्रा. दीपक सर्जेराव तडाखे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार’, मलकापूरचे नगरसेवक भीमाशंकर इराप्पा माहूर यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार’, एनआयएस राष्ट्रीय कोच व कुस्ती प्रशिक्षक प्रा. पै. अमोल हरिबा साठे यांना ‘राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’, तर ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असून अध्यक्षस्थानी शेतीमित्र अशोकराव थोरात, मलकापूर राहणार आहेत. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे नेते भानुदास माळी, डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, महात्मा फुले जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव मोहिते, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, कामगार नेते व उद्योजक महेंद्र घरात, दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक आघाडीचे अध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील चिखलीकर तसेच सातारा जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुषमा राजेघोरपडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय तडाके हे या समारंभाचे स्वागताध्यक्ष आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments