कोयना धरणातून २१ हजार
क्युसेक्स पाणी नदीपात्रात
सातारा : पाटण तालुक्यातील कोयना धरणात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ७८.२९ टीएमसी ७४.३८ टक्के तर जिवंत ७३.१७ टीएमसी ७३.०७ टक्के पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून १० हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तथापि, पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस असल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी सात वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात आणखी वाढ करून २० हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. पाणीपातळीत जशी वाढ होईल त्यानुसार विसर्गातही वाढ करण्यात येईल.धरण पायथा विद्युतगृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग २१०५० क्युसेक्स असणार आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडून पाणी सोडण्याचे चार वाजता नियोजन होते. मात्र, संततधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गृह विभागाची बंद बोट सुटून धरणाच्या गेट जवळ आली होती. त्यामुळे बोटीला सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम सुरू असल्याने हे वक्र दरवाजे पाच वाजता खुले करण्यात आले. त्यातून एकूण दहा हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. गोकुळ तर्फ पाटण येथे कोयना नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी संध्याकाळी पाण्याचा विसर्ग पाच हजार क्युसेक्सवरून वाढवून एकूण विसर्ग सात हजार क्युसेक्स करणेत येईल. पाण्याच्या आवकेनुसार त्यात विसर्ग कमी जास्त करण्यात येईल.
कण्हेर धरणातून वेण्णा नदीत दुपारी १२ वाजता पाणी सोडल्यामुळे करंजेकडून म्हसवेकडे जाणारा पूल व हमदाबाजकडून किडगावकडे जाणारा पूल पाण्याखाली जाणार असल्याने या पुलावरून कोणीही वाहतूक करू नये, तसेच वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वीर धरण ७५.८० टक्के भरले आहे. वीर धरणात पाण्याची आवक पाहता वीर धरणातून येत्या ४८ तासात नीरा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने खंडाळा व फलटण तहसीलदारांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
पाटण तालुक्यातील उत्तरमांड, जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पातील महू व हातगेघर धरणाच्या सांडव्यातून ६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर महाबळेश्वर येथील लिंगमळा धबधबा व परिसरातील पॉईंटवर पर्यटकांना जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत पर्यटकात व स्थानिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात व घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा,महाविद्यालये, आयटीआय या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना दि.२६ जुलैला सुट्टी जाहीर केली आहे. शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, त्याचप्रमाणे इयत्ता दहावी व बारावीच्या जुलै २०२४ च्या फेरपरीक्षा राज्य मंडळ पुणे यांच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी ने दिले आहेत.
कैलास स्मशानभूमीचे दहा अग्नीकुंड पुराच्या पाण्याखाली
संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीमध्ये सततच्या पावसामुळे खालचा टप्प्यावर पाणी आले असून दहा अग्नीकुंड पाण्याखाली गेले आहेत.वरील टप्प्यावर अंत्यसंस्कार सुरू आहेत. मात्र, संततधार पाऊस व कण्हेर धरणातून सात हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याने संपूर्ण कैलास स्मशानभूमी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास संपर्क करून माहिती घेऊनच कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी मृतदेह आणावेत असे आवाहन श्री बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!