साताऱ्यात जुन्या सिव्हिलच्या जागेवर उभारणार सुसज्ज कॅथलॅब

 


साताऱ्यात जुन्या सिव्हिलच्या

जागेवर उभारणार कॅथलॅब

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; राज्य शासनाकडून मिळाली मंजुरी

सातारा : दिवसेंदिवस हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हृदयरोगावर आधुनिक उपचार मिळण्यासाठी साताऱ्यातील रुग्णांना पुणे, मुंबई अथवा अन्य मोठ्या शहरांमध्ये जावे लागत आहे. मात्र आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार साताऱ्यातील जुन्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेवर सुसज्ज आणि सर्व सोयी- सुविधांनी युक्त कॅथलॅब उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हावासियांच्यावतीने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत.

आ. शिवेंद्रसिंहराजेंनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातारा शहरातील शाही मस्जिदच्या शेजारील जुन्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेत सुसज्ज कॅथलॅब उभारण्यात यावी, अशी मागणी करून या आशयाचे निवेदनही दिले होते. त्याचवेळी ना. फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कॅथलॅब उभारणीसाठीची पुढील कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच सातारा जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना कॅथलॅब उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने तयार करून राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

लवकरच जुन्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेवर सुसज्ज कॅथलॅब उभारली जाणार असून हृदयविकारावर उपचारासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रसामुग्री याठिकाणी असणार आहे. कॅथलॅबमधे तपासणी विभाग (ओपीडी), ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, आठ ते दहा बेडचा वॉर्ड आदी सुविधा असणार आहेत. कॅथलॅबमध्ये ऍंजिओग्राफी, एन्जीओप्लास्टी यासह सर्वप्रकारचे उपचार केले जाणार आहेत. यासाठीचे तज्ञ् वैद्यकीय पथक आणि स्टाफही असणार आहे. या सुसज्ज कॅथलॅबमुळे सातारा जिल्ह्यातील हृदयरोग रुग्णांची ससेहोलपट थांबणार असून त्यांना साताऱ्यातच अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. कॅथलॅब मंजुरीमुळे आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments