प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनानिमित्त उद्या एक लाख रामज्योती प्रज्वलित

 


प्रभू श्रीरामाच्या

प्राणप्रतिष्ठापनानिमित्त

उद्या एक लाख रामज्योती प्रज्वलित

खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार महाआरती : धैर्यशील कदम

सातारा : अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचा उत्सव देशभरात होत आहे. जिल्ह्यात हा उत्सव प्रत्येक मंदिरात, घराघरांत केला जाईल. यादिवशी साताऱ्यातील गांधी मैदानावर सायंकाळी सहा वाजता एक लाख रामज्योती पेटविल्या जाणार आहेत. या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून रामज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले आहे.


कदम यांनी आज खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी विकास गोसावी, चिन्मय कुलकर्णी, पंकज चव्हाण, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात मंदिरांची स्वच्छता केली जात आहे. नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर येथून आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहरातील मंदिरांची स्वच्छता केली जात आहे. लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यात सहभागी होत आहेत..२२ रोजी जिल्ह्यातील सर्व मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,मकरंद पाटील, महेश शिंदे, मदन भोसले, अतुल भोसले, मनोज घोरपडे आदींसह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत, असेही कदम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments