तासगावच्या मेळाव्यात
महाविकास आघाडीचे
शक्तिप्रदर्शन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला थेट आव्हान
एकजुटीच्या बळावर हा गड जिंकू : अभयसिंह जगताप
तासगाव, प्रतिनिधी : सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेत परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने तासगाव येथे भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी महायुतीवर अप्रत्यक्ष टीका करत मतदारसंघात विजयाचा ठाम दावा केला.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांशी संवाद साधत निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची दिशा आणि विजयाची रणनीती मांडली. मेळाव्यात उपस्थित लोकप्रतिनिधींच्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी ज्येष्ठ नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यातील भाषणांमध्ये महायुतीच्या कारभारावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता राजकारण केले जात असल्याचा आरोप काही वक्त्यांनी केला. तर दुसरीकडे महाविकास आघाडी हीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय देणारी आघाडी असल्याचा दावा करण्यात आला.
"सांगली–सातारा विधानपरिषद मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित करायचा," असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून महायुतीला धक्का देण्याचा संकल्पही या मेळाव्यात करण्यात आला.
महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी, "लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला विश्वास हीच माझी ताकद आहे. आदरणीय शरद पवार यांच्या विचारांवर आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीच्या बळावर हा गड जिंकू," असा विश्वास व्यक्त केला.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगावच्या मेळाव्याने महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, या निवडणुकीत महायुतीसमोर कडवे आव्हान उभे राहणार असल्याचे संकेत या मेळाव्यातून मिळाल्याचे बोलले जात आहे.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!